चाळीसगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या रविवारी होणा-या मतदान प्रक्रियेची शनिवारी पूर्ण तयारी झाली आहे. कोरोना संसर्गाविषयी पूर्णपणे खबरदारी घेतली असून मतदानासाठी १३ केंद्र सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचले आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.गिरणा परिसरात सर्वोदय शिक्षण संस्थेच्या विविध शाखा असून माध्य. विद्यालयांसह, वसतिगृहे, आयटीआय, आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. कोरोना महामारीत न्यायालयाच्या आदेशाने संस्थेची पंचवार्षिक निवडणुक होत आहे. सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी होऊन निकाल जाहिर केले जाणार आहे. कोरोनातच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यामुळे उद्या मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणण्याचे मोठे आवाहन असणार आहे.कोरोनाची खबरदारी घेऊन १३ केंद्रांवर सुरक्षित अंतरावर मतदारांना उभे करुन मतदान घेतले जाणार आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल. प्रकृतीबाबत त्रास असणा-या मतदारांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदानाची संधी देण्यात आली. दुपारी चार वाजता मतदान प्रक्रिया संपेल.दोन पॕनल मध्ये चुरशीची लढत१९ जागांसाठी एकुण ४५ उमेदवार आखाड्यात आहे. दोन पॕनल मध्ये सरळ लढत होत असून यामुळे चुरस निर्माण झाली. सर्वसाधारण गटातील १४ जागांसाठी सर्वाधिक उमेदवारांनी शड्डु ठोकले आहे. उर्वरीत गटात समोरासमोर लढती होत आहे. मातब्बर रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.६७० सभासदांचा मतदानाचा मार्ग मोकळासंस्थेचे एकुण ४६८१ सभासद असून ६७० सभासदांचा वाद न्यायालयात पोहचला होता. यावर शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होऊन यासभासदांना मतदानापासून मज्जाव करणारी विरोधकांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे सात्ताधा-यांना दिलासा मिळाला आहे.
चाळीसगावच्या 'सर्वोदय'च्या मतदानाची तयारी पूर्ण, रविवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 7:15 PM