चाळीसगाव :
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।’
जगतगुरू संत तुकोबाराय यांचा हा अभंग आयुष्याचे पसायदान करताना ८३ वर्षीय दूध व्यावसायिक केशव रामभाऊ कोतकर यांनी गत सहा वर्षांत वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेत ४२१ झाडांचे बीजारोपण करून ती फुलवलीदेखील आहेत. चाळीसगाव पंचक्रोशीत त्यांची ‘ट्री फ्रेन्डस्’ ही नवी ओळख अधोरेखित झाली आहे. पर्यावणदिनी हिरवळीचा जागर करताना त्यांची ‘ग्रीन एनर्जी’ म्हणूनच प्रेरणादायी ठरते.
दूध व्यवसायात लोकल ते ग्लोबल झेप घेतानाच केशव कोतकर यांनी समाज समर्पणासाठीही पदझळ सोसणारे हात पुढे केले आहेत. पर्यावरणाचा संदेश देताना त्याला कृतिशील चळवळीची जोड दिली आहे. म. फुले कॉलनी परिसर, गवळीवाडा, नेताजी चौक, आ.ब. विद्यालय व बलराम शाळेचे मैदान, कामगार भवन परिसर, एम.जी.नगर परिसरात गेल्या सहा वर्षांत ४२१ झाडे लावली आहेत. ही झाडे चांगलीच बहरली असून या परिसराला हिरवळीचा साज चढला आहे. परिसराचे सौंदर्यही शतपटीने वाढले आहे. उन्हाळ्यात या वृक्षराजीचे अलौकिक मोल परिसरातील रहिवाशांच्याही लक्षात येत आहे. झाडे लावण्यापासून ते संरक्षक जाळी लावणे, नियमित पाणी देणे, देखरेख ठेवणे, अशी सर्व कामे कोतकर परिवारातील सदस्य मोठ्या उत्साहाने करतात.
.........
चौकट
वाढदिवसाला केले जाते वृक्षांचे बीजारोपण
कोतकर यांचा एक जून रोजी वाढदिवस असतो. आपल्या वयाइतके झाडे ते दरवर्षी लावतात. सहा वर्षांपूर्वी ७८ वा वाढदिवस त्यांनी ७८ झाडे लावून साजरा केला. गेल्या सहा वर्षांत अशी ४२१ झाडे त्यांनी लावून जगवली आहेत. या वृक्षांमध्ये वड, पिंपळ, शेवगा, मुलमोहोर, नारळ, बेल अशा बहुपयोगी झाडांचा समावेश आहे. सामाजिक दायित्वातून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया कोतकर यांचे सुपुत्र राजेंद्र कोतकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. परिसरात झाडांचे महत्त्व सांगणाऱ्या प्रतिकृतीही त्यांनी साकारल्या आहेत.
...........
इन फो
झाडेच खरी परोपकारी
अवघ्या सृष्टीमध्ये झाडेच खऱ्या अर्थाने परोपरी आहेत. झाडे हयात असताना आणि पानगळ झाल्यानंतरही माणसाच्या उपयोगी ठरतात. झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. म्हणूनच ही हरित चळवळ सुरू केली आहे.
- केशव रामभाऊ कोतकर
चाळीसगावकर ट्री फ्रेन्ड्स
........
विशेष चौकट
पाटणादेवी जंगल परिसर : पर्यावरणाचा दुर्मीळ खजिना
चाळीसगाव शहरापासून नैऋत्येला अवघ्या १८ किमी अंतरावर सातमाळा डोंगर रांगांच्या ओंजळीत पाटणादेवी जंगल परिसराची जैवविविधा नटली आहे. पर्यावरणाचा दुर्मीळ खजिनाही येथे एकवटला आहे. पावसाळ्यात येथील हिरवेगार सौदर्य अधिक खुलून निघते. दुर्मीळ वृक्षराजी सोबतच प्राणी व पक्षी संपदा येथे आढळते. इतरत्र अभावाने आढळणारे गौणखनिज, वनौषधींनी हा परिसर बहरला आहे. साडेसहा हेक्टर परिसरात हे जंगल व्यापले असून गौणखनिज चोरी व अवैध वृक्षतोड न रोखल्यास हा परिसरही भकास होऊ शकतो. याबाबत पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करतात. थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांची तपोभूमी असून महायुतीच्या सत्ताकाळात येथे ‘गणितनगरी’ उभारण्याची घोषणा केली गेली होती.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
२५ प्रजातींची फुलपाखरे
य.ना. चव्हाण महाविद्यालयात प्रा. डॉ. अजित कळसे यांनी पाटणादेवी जंगल परिसरातील जैवविविधतेवर संशोधन केले आहे. या परिसरात २५ प्रजातींची फुलपाखरे आहेत. फुलपाखरांची वयोमर्यादा अवघी १५ दिवसांची असते. २०१९ मध्ये कळसे यांनी सलग एक महिना येथे संशोधन केले. त्यांना आठ प्रकारातील फुलपाखरे आढळून आली. दरवर्षी केल्या जाणाऱ्या प्राणी गणनेतही जंगल परिसरात विविध प्रकारच्या प्राण्यांची नोंद केली जाते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणी गणनेत ११ बिबटे, नीलगाय, मोर, १५० माकडे, रानडुकरे आदींचा येथे अधिवास आहे. दुर्मीळ पक्षांचा किलबिलाटही कानात रुंजी घालतो.