जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी महसूल विभागाकडून महसूल, गौणखनिज यांची ७० टक्के वसुली झाली आहे. ३१ मार्चपर्यंत उर्वरित ३० टक्के महसूल वसुलीचे आव्हान आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त राधाकृष्णा गमे यांनी महसूल विभागाच्या वसुलीचा ऑनलाइन आढावा घेतला. त्या वेळी महसूल विभागाने वसुलीविषयी माहिती सादर केली. यात मावळत्या आर्थिक वर्षाच्या सुुरुवातीपासून असलेल्या कोरोना संसर्गामुळे ठप्प झालेले व्यवहार व कार्यालयीन कामकाजावर झालेला परिणाम यामुळे महसूल वसुलीविषयी चिंता होती. मात्र या काळातही वसुली होऊन आतापर्यंत ७० टक्के वसुली झाली आहे. या विषयी आयुक्त गमे यांना माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील स्थितीविषयीदेखील आयुक्त गमे यांनी माहिती घेतली.