जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. या विषाणूपासून आधीचं जळगावकर त्रस्त असताना, आता दुचाकी चोरट्यांनी सुध्दा जळगावकरांच्या डोक्याचा ताप वाढविला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून दिवसाला दोन दुचाकी शहरातून चोरीला जात आहेत. त्यामुळे आता दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरात घरफोडी, मोबाईल चोरी तसेच दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आता दुचाकी चोरट्यांनी डोके वर काढले आहे. शहरातून दिवसाला दोन व त्यापेक्षा अधिक दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान समोर उभे राहिले असून त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी नवीन बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून मंगळपोत लांबविण्याच्या घटनाही वाढल्या होत्या. मात्र, पोलिसांना त्या चोरट्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे आपली दुचाकी कुठं उभी केली तर ती सुरक्षित आहे कि नाही, अशी भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा दुचाकी चोरून नेल्या जात आहे. गोलाणी मार्केट परिसर, भास्कर मार्केट, नवीन बसस्थानक, जिल्हा रूग्णालय परिसर व काही खाजगी रूग्णालयाच्या आवारातून गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या परिसरांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असावा, अशीही मागणी होत आहे.