सुनील पाटील
जळगाव : पंजाबराव उगले यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचे सूत्रे स्विकारली आहेत. महाराष्टÑाच्या नकाशावर जळगाव जिल्हा हा संवेदनशील म्हणून आहे. सीमी संघटना, नालासोफारा बॉम्बस्फोट,गौरी लंकेश हत्या यासारख्या घटनांमधील सहभाग पाहता गुप्तचर यंत्रणचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे.राजकीयदृष्ट्याही हा जिल्हा तसा संवेदनशील आहे. एकीककडे हे नाजूक प्रकरण तर दुसरीकडे पोलीस दलातील अंतर्गत गटबाजी, अवैध धंदे यावर नियंत्रण मिळविणे हे उगले यांच्यासाठी आव्हान आहे. मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील शंभर टक्के नाही, परंतु अवैध धंद्यांना बºयापैकी नियंत्रणात आणले होते. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी दुखावले गेले होते. अवैध धंदे सुरु करण्याची हिंमत एकाही अधिकारी व कर्मचा-यांनी केली नाही. सामान्य नागरिकांना टिका करण्याची संधी शिंदे यांनी शक्यतो कधी दिली नाही. त्यांच्याधाडसी निर्णयांचे सामान्य नागरिकांनी कौतुकच केले. अपवादात्मक स्थितीत शिंदे यांच्यावर टीका झाली, परंतु त्यांनी त्याची परवा केली नाही. आपले काम सुरुच ठेवले. एरव्ही पोलिसांवर वरचढ ठरलेल्या अवैध धंदे चालकांना त्यांची जागा दाखविली. आता उगले यांच्यासमोर हेच मोठे आव्हान आहे. अवैध धंदे नियंत्रणात ठेवणे आणि अंतर्गत गटबाजीला लगाम घालण्याचे आव्हान आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाची अंतर्गत गटबाजी इतकी भयंकर आहे की, केव्हा आपल्या सहका-याची व्हिकेट पडेल हे सांगता येत नाही. बहुतांश अधिकारी, कर्मचारी पोलीस खात्याशी कमी पण राजकारण्यांशीच अधिक प्रामाणिक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्याचा थेट फटका हा पोलीस अधीक्षकांना बसला आहे. त्यामुळे येथे तर ताकही फुंकून प्यावे लागते अशीच स्थिती आहे. आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका आहेत. जळगावचे राजकीय वातावरण तसेच हॉटच असते. त्यामुळे उगले यांच्यासाठी येणारा काळ कसरतीचाच राहणार असून खºया अर्थाने त्यांची कसोटीच लागणार आहे. या सा-या परिस्थितीत उगले कशी बॅटींग करतात हे काळच सांगेल.!