महापालिकेत ऐतिहासिक बहुमताने नंतर देखील अवघ्या अडीच वर्षात भाजपने सत्ता गमावली आहे. शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सत्ताधाऱ्यांना करता न आल्याने भाजपामध्ये अंतर्गत बंडाळी उठून अवघ्या अडीच वर्षातच भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. त्यात बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर कमी जागा असतानाही शिवसेनेचा महापौर महापालिकेत झाला आहे. नवीन महापौर जयश्री महाजन यांच्या समोर शहरातील समस्यांचा मोठा डोंगर उभा आहे. त्यात कोरोनाचे संकट देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील समस्या सोबत कोरोनाचे संकट देखील महापौरांना पार पाडावे लागणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने शहरातील समस्या सोडविण्यासाठी लागणारा निधी जळगाव महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील शासनाने महापालिकेला दिलेल्या १०० कोटींचा निधीवर विद्यमान शासनाने लावलेली स्थगिती देखील उठू शकते. ही बाब नूतन महापौरांसाठी जमेची ठरू शकते. मात्र शहरातील वाढते कोरोना चे संकट थोपविण्यासाठी महापौरांना महापालिका प्रशासनाने सोबत चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. माजी महापौर भारती सोनवणे यांनी कोरोना काळात मनपाच्या कोरोना सेंटर वर जाऊन स्वतः कटाक्षाने लक्ष घालून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यासह प्रशासनासोबत राहून कोरोना काळात शहरातील नियमित फवारणी, कोरोना सेंटरमधील रुग्णांना मिळणार्या जेवणाची गुणवत्ता कायम ठेवणे यासह महापालिका वैद्यकीय विभागाद्वारे होणारा कामांचा नियमित आढावा घेऊन कोरोना काळात चांगले काम केले होते. नूतन महापौर जयश्री महाजन या उच्चशिक्षित असून, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या रूपाने चांगला अनुभव देखील आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी राज्य शासनाची मदत घेऊन मनपा प्रशासनाला एक प्रकारे बळकटी देण्याचे काम महापौरांकडून होऊ शकते. महापालिकेतील वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून या जागा शासनाच्या मदतीने जर भरण्यात आल्या तर वैद्यकिय विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. यासह शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नूतन महापौर जयश्री महाजन यांच्याकडे शहरातील समस्या सोडविण्यासाठी जादूची कांडी नसली तरी राज्यात शिवसेनेचे असलेले सरकार महापालिकेतील सत्ताधारी साठी एक प्रकारे जादूच्या कांडी सारखेच आहे. मागच्या सत्ताधाऱ्यांना राज्यात सत्ता असताना देखील त्या सत्तेचा वापर महापालिकेसाठी किंवा शहरातील विकासासाठी चांगल्या प्रकारे करता आला नव्हता. आता राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने त्यातच नगर विकास मंत्री पद हे शिवसेनेकडेच असल्याने शहरातील अनेक प्रश्नांसाठी आवश्यक निधी या विभागाकडून प्राप्त होऊ शकतो. शहरात अनेक समस्या असल्या तरी सर्वात प्राधान्याने रस्त्याची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, नूतन महापौरांना देखील हे आव्हान पेलण्यासाठी नागरिकांनी काही दिवस वेळ देण्याची गरज आहे. मात्र नागरिकांचा संयम सुटेल एवढा वेळ देखील न घेता सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्ता प्रश्न प्रधानाने सोडवण्याची गरज आहे.
कोरोनासह शहरातील समस्या सोडवण्याचे महापौरांना समोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:16 AM