लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- महापालिका प्रशासनाकडून एकीकडे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची वसुली ची मोहीम सुरू असतानाच, दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लावण्यात आलेले कर्मचारी आता कोरोना नियंत्रणाच्या कामी नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कराचा वसुलीवर गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेची आतापर्यंत पन्नास टक्के वसुली झाली आहे. तसेच उर्वरित १९ दिवसात महापालिकेला ५० टक्के वसुलीचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची रक्कम भरण्याची ३१ मार्च पर्यंत शेवटची मूदत असून, मनपाने सालाबादाप्रमाणे मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी कंबर कसली आहे. मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रभाग समिती निहाय प्रत्येकी ३ अशा १२ पथकांची नियुक्ती केली असून, दररोज शहरातील प्रत्येक भागात वसुलीची मोहीम राबविण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र महापालिकेने मिशन वसुली राबविल्यानंतर शहरात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मनपाच्या वसुलीच्या मिशनवर देखील परिणाम जाणवत आहे. महापालिकेत कर भरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तर मनपा कर्मचारीदेखील कोरोना नियंत्रणाच्या कामावर नियुक्त झाल्यामुळे वसुली मिशन पुन्हा थांबले आहे.
गेल्यावर्षीही बसला होता कोरोनामुळे फटका
गेल्यावर्षी मार्च महिन्यातच महापालिकेकडून मालमत्ता कराचा वसुलीसाठी पथक तयार करून मिशन वसुली राबवण्यात आले होते. मात्र त्यावेळेसही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर करण्यात आलेल्या लाॅक डाऊन मुळे महापालिकेची वसुली मोहीम थांबली होती. गेल्या वर्षी देखील महापालिकेची केवळ ६० टक्के वसुली झाली होती. यावर्षीही महापालिकेची सद्यस्थितीत ५० टक्के वसुली झाली असून, आता उर्वरित वसूली करण्याचे आव्हान महापालिकेसमोर निर्माण झाले आहे. तरी महापालिकेकडून यावर्षी थकीत रक्कम वसूल करण्यासाठी अभय योजना राबवण्यात आली होती. या योजनेतून महापालिकेला गेल्या वर्षाची थकबाकी काही प्रमाणात वसूल करण्यात यश मिळाले आहे.
गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबितच
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच महापालिकेला मालमत्ता कराचा रकमेतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. कारण मुदत संपलेल्या तब्बल २३ मार्केटमधून महापालिकेला गेल्या आठ वर्षापासून शंभर कोटी रुपयांची थकबाकी मिळाली आहे. गाळेधारकांकडे मनपाची तब्बल तीनशे कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे. अशा परिस्थितीत मालमत्ता कराची वसुली झाली नाही तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती पुन्हा बेताची होऊ शकते. मनपाने गाळेधारक आंकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी तयारी केली होती. मात्र, कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व शासनाकडे होणारी गाळेधारकांची बैठक यामुळे ही कारवाई पुन्हा थांबली आहे. तसेच शासनाकडून देखील या प्रश्नी कोणतेही लक्ष दिले जात नसल्याने गाळे प्रश्न पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या मनपाची यंत्रणा कोरोना च्या नियोजनासाठी तैनात करण्यात आली आहे. जनता कर्फ्यू नंतर महापालिकेकडून वसुलीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. ३१ मार्चपर्यंत महापालिकेकडून वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर राहणार आहे.
-सतीश कुलकर्णी , आयुक्त