लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास काही दिवस शिल्लक असतानादेखील आव्हाणे येथे कोणत्याही अधिकृत पॅनलची घोषणा झालेली नाही. यंदाच्या निवडणुकीत आव्हाण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, तिन्ही पॅनलकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. एकीकडे पॅनलप्रमुख उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडे उमेदवार कागदपत्रांच्या जुळवा-जुळव मध्ये व्यस्त आहेत. अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीच्या धामधुमीला वेग येणार आहे.
आव्हाणे ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे विलास पाटील (कीटू नाना), पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, माजी सरपंच विजय दत्तात्रय
पाटील, भगवान नामदेव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका संघटक ईश्वर पाटील यांचे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही नेत्यांचे
पॅनल पूर्णपणे तयार झालेले नाही. दरम्यान, भाऊबंदकीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. गावातील प्रगतिशील शेतकरी रवींद्र योगराज चौधरी
यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती. मात्र, उमेदवारांबाबत एकवाक्यता न झाल्याने बिनविरोध
होण्याची शक्यता आता मावळल्याने आता सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. आव्हाणे येथे एकूण
१३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
फुपनगरीत युवक एकत्र
फुपनगरीमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असून, जितेंद्र अत्रे यांनी पॅनलची तयारी केली असून, बैठकांचे सत्रदेखील सुरू झाले आहे. तर गणेश जाधव यांनी यंदा युवकवर्गाला संधी देण्याची मागणी करत, युवकांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अत्रे यांनीही युवकांचा भरणा करून पॅनल तयार करण्याची घोषणा केली आहे. तर ज्येष्ठ नेत्यांनीही यंदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
कठोऱ्यात बिनविरोधसाठी प्रयत्न
कठोरा ग्रामपंचायतीत गेल्या तीन पंचवार्षिपासून बिनविरोधची परंपरा सुरू असून, यंदाही युवकवर्गाकडून बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्राथमिक बैठकदेखील घेण्यात आली असून, त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती डॉ. सत्त्वशील जाधव यांनी दिली.