लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना नंतर आता प्रथम १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहे. त्यात महाविद्यालयांमध्ये रोटेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना बोलवण्याचे आणि शिक्षण देण्याचे आव्हान आहे. विद्यापीठ आणि शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार जागेच्या उपलब्धतेनुसार फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलवण्याचे आव्हान आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणही या परिपत्रकानुसार सुरू ठेवावे लागणार आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यातील अटी पुर्ण करण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यात फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावले जाईल. त्यात महाविद्यालयात येणारे विद्यार्थी नेमके कोण आणि ते कसे ठरवायचे हे आव्हान आता महाविद्यालयांच्या समोर आहे.
वसतीगृहे टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विद्यापीठांनी तयार करावी.
प्रात्याक्षिक परिक्षा देखील होणार
विद्यापीठातर्फे जानेवारी २०२१पासून सुरू झालेल्या पदवीच्या आणि अभियांत्रिकीच्या पाचव्या आणि सातव्या सत्राच्या लेखी परिक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करून पुर्णत्वास आलेल्ा आहेत. विद्यार्थ्यांना सत्रातील नियमीत प्रात्याक्षिके बॅचवाईज रोटेशन पद्धतीने पुर्ण कराव्यात. त्यानंतर या प्रात्याक्षिक परिक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येईल. याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक देखील नुकतीच पार पडली होती.
तसेच यंदा प्रात्याक्षिके ही कोविड १९ मुळे या वर्षी वार्षिक पद्धतीने घ्यावीत,असे ठरले होते. मात्र शासनाच्या निर्देशानुसार क्लासेस घेण्यास परवानगी दिल्याने हा निर्णय रद्द करून त्याऐवजी पुर्वीप्रमाणेच सत्र पद्धतीने घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नाही. तसेच ५० टक्के रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करुन कार्यवाही करावे, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता कोणत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवायचे आणि कसे, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचा मेळ घालायचा तरी कसा, असा प्रश्न महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संस्थाचालकांना पडला आहे.