जळगाव - गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती असल्याने तालुक्यातील आव्हाणे येथे बस बंद करण्यात आली होती; मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व बाजारपेठादेखील उघडल्या आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या गावाची बस सुरू करण्याची मागणी आव्हाणे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी शहरात येत असून, बस नसल्याने फाट्यावर जावून शहरात यावे लागत असल्याचे चित्र आहे.
शहरातील मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव - शहरातील साफसफाईचे काम ठप्प झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरदेखील कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. त्यात शहरातील मुख्य व्यापारी संकुल असलेल्या गोलाणी मार्केट, बी.जे.मार्केट, फुले मार्केट भागातदेखील मनपाकडून साफसफाई होत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मनपा प्रशासनाकडून रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र इतर दिवशी मात्र या समस्येकडे डोळेझाक होताना दिसून येत आहे.
एलईडी पडले बंद
जळगाव - शहरात महापालिकेच्यावतीने १५ हजार एलईडी बल्ब लावण्यात आले असून, अवघ्या दोन महिन्यातच शहरातील अनेक भागातील एलईडी बंद अवस्थेत आढळून येत आहेत. एलईडी बसविण्यासोबतच त्या एलईडीची देखभाल दुरुस्ती मक्तेदाराला करावी लागणार आहे; मात्र अनेक ठिकाणी एलईडी बंद असतानाही ते दुरुस्त केले जात नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर रात्रीच्यावेळेस अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
सातपुडा बहरला
जळगाव - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुड्याचा निसर्ग बहरला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेले सातपुड्यात ओढे वाहू लागले असून, धबधबेदेखील आता ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे चिंचपाणी, निंबादेवी, वाघझीरा, मनुदेव परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस नसल्याने ऐन पावसाळ्यात पर्यटकांनी पाठ फिरवली होती; मात्र आता परिस्थिती बदलली आहे.