अमित महाबळ, जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले असले तरी निकालाची कमी असलेली टक्केवारी, कॉपीचे वाढलेले प्रमाण आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची गैरहजेरी, याबद्दल कुलगुरुंनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राध्यापकांना लिहिलेल्या पत्रातून चिंता व्यक्त केली आहे.
विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत. यानंतर कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्राध्यापकांना पत्राव्दारे उत्तरपत्रिका मूल्यमापनाच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहभाग घेतल्यामुळे निकाल वेळेवर जाहीर करता आले, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र, निकालाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. शिवाय कॉपीचे प्रमाण वाढले आहे. या चिंताजनक बाबी आहेत. निकालाची टक्केवारी समाधानकारक असावी याकरिता महाविद्यालय स्तरावर विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी वाढेल, अध्ययन प्रक्रियेतील त्यांचा सहभाग अधिक कृतिशील कसा होईल, त्यासाठी आपले अभ्यासक्रमांचे स्वरूप रोजगाराभिमुख कसे करता येईल याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पारंपरिक साच्यात अडकू नका...
युवा पिढीचा कल लक्षात घेऊन शिक्षणाच्या पारंपरिक साच्यात न अडकता नव्या आव्हानांना कुशलतेने आणि व्यावहारिकतेने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल, असे म्हटले आहे. खान्देशाच्या खेड्यापाड्यातील उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या युवा पिढीच्या भवितव्याला आकार देण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात आपण सगळे नवीन ऊर्जा घेऊन सज्ज होऊयात, असा आशावाद कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.