फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील येथील इस्कॉन मंदिरात चंदन यात्रा महोत्सव आयोजित केला गेला. लॉकडाऊनमुळे मंदिरापुरता हा महोत्सव साध्या पद्धतीने पार पडला.अक्षय्य तृतीया ते ज्येष्ठ कृष्ण अष्टमी तिथीपर्यंत २१ दिवस हा उत्सव साजरा होतो. जो वैष्णव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा कालावधी असतो. भक्तीच्या विभिन्न अंगांमध्ये भगवंतांच्या शरीरावर चंदनासहित अन्य सुगंधित लेप लावणे समाविष्ट आहे. या दिवसात समस्त वैष्णव भक्त आपले आराध्य भगवान श्रीकृष्णांच्या संपूर्ण शरीरावर चंदनाचा लेप लावतात. वैशाख महिन्यात वातावरणात खूप उष्णता असते. म्हणूनच चंदनाचा लेप लावून भगवंतांना शीतलता प्रदान केली जाते. भगवान श्रीकृष्ण शृष्टीच्या कणा कणांत विद्यमान आहेत. म्हणून जेव्हा भगवंताला चंदनाचा लेप लावून शीतलता प्रदान केली जाते तेव्हा त्याच्या प्रभावाने प्रत्येक जीव शीतलतेचा अनुभव करतो.अशी दंतकथा आहे की, भगवान जगन्नाथांनी स्वत: राजा इंद्रद्युम्नला आदेश दिला होता की, वैशाख महिन्यात चंदन महोत्सव साजरा केला जावा. वृंदावनातील सर्व मंदिरांमध्ये भगवंतांच्या विग्रहाला चंदन लेप लावून सजवले जाते.दरवर्षी भव्य रीतीने साजरा होणारा हा उत्सव यावर्षी लॉकडाउनमुळे मंदिरापुरता मर्यादित रीतीने साजरा करण्यात आला, अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष माधव प्रभू यांनी दिली.
फैजपुरात इस्कॉन मंदिरात चंदन यात्रा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 15:27 IST