राजेंद्र भारंबे
पंढरपूर : आषाढीला वैष्णवांच्या जनसागराने भरणारे चंद्रभागा तीर कोरोना पार्श्वभूमीवर निर्मनुष्य होते. भाविकांच्या भक्ती रसाने गर्जनारे अवघे चंद्रभागेचे वाळवंट सुने सुने होते. पोलिसांचा बंदोबस्त आणि वैष्णवांच्या प्रतीक्षेतील चंद्रभागा तीर अशात बुधवारी सकाळी ११ वाजता संत मुक्तबाईच्या पादुका स्नानासाठी पोहोचल्या. याप्रसंगी मृदुंगावर पडणारी थाप, टाळचा मेंदूपर्यंत पोहोचणारा आवाज त्याला मुक्ताईसह पांडुरंगाच्या जयघोषाची साथ, मर्यादित वारकरी असतानाही ‘अवघे गरजे पंढरपूर चालला नामा’चा गजर असा भास जाणवत होता.दशमीला पंढरीत दाखल झालेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताई मठात विसावला आहे. परंपरेप्रमाणे मठातून पांडुरंगाला नैवेद्य दिला जात आहे. मंगळवारी आषाढीला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर बुधवारी द्वादशी मुक्ताई पादुकांचे भक्ती भावाने चंद्रभागा स्नान पार पडले. तत्पूर्वी मठात लक्ष्मण महाराज वाघोदेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालखी सोहळा चांद्रभागेतीरी पोहोचला. येथे पादुकांचे चंद्रभागा स्नान पार पडले. परतीच्या मार्गावर भक्त पुंडलिकाचे दर्शन करून वारी परत मुक्ताई मठात विसावली. भक्तीरसात तल्लीन वारकऱ्यांनी येथे फुगडीचा आनंद घेतला. दुपारी महंत यांचे कीर्तन झाले. सायंकाळी हरिपाठ अशी दिनचर्या राहिली.मुक्ताई पादुकांच्या चंद्रभागा स्नानप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पंजाबराव पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, पंकज महाराज, पांडुरंग पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीप झांबरे यांच्यासह दिंडीतील वारकरी उपस्थित होते.