आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.७ : महसूल तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी जळगावात झालेल्या बहिणाबाई महोत्सव व दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थिती देण्यासाठी विमानाचा पाच लाखांचा खर्च सोसत हजेरी लावली.दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणा-या दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते जळगाव येथील कांताई सभागृहात सकाळी १० वाजता होते.तसेच भरारी फाउंडेशनतर्फे जळगाव येथील सागर पार्कवर बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दुपारी १ वाजता झाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १० जणांना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी आयोजकांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आग्रह केला होता. या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर संध्याकाळी त्यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमाला जायचे होते. एकाच दिवसात हा प्रवास शक्य नसल्याने त्यांनी विमानाची चौकशी केली. जळगावच्या दौ-यासाठी पाच लाखांचा खर्च येणार असल्याने चंद्रकांत दादा यांनी दोन्ही आयोजकांना जळगावला येण्याऐवजी प्रत्येकी अडीच लाखांची मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र दोन्ही आयोजकांनी उपस्थितीसाठी आग्रह कायम ठेवल्याने ढगाळ वातावरण असताना त्यांनी पाच लाखांची रक्कम मोजत जळगावातील दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली. दोन्ही कार्यक्रम आटोपते घेत ते दुपारी सव्वा दोन वाजता विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले.
जळगावातील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आयोजकांकडून आग्रह होता. मात्र व्यस्त कार्यक्रमांमुळे विमानाने प्रवास करावा लागणार होता. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. आपण जळगावला न येता विमानासाठी येणारा पाच लाखांचा खर्च प्रत्येकी अडीच लाख रुपये दोन्ही संस्थांना देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आपण उपस्थित राहण्याबाबत त्यांचा आग्रह कायम होता.- चंद्रकांतदादा पाटील, महसूल तथा पालकमंत्री जळगाव.