वादानंतर आयुक्तांच्या दालनासमोर बंदोबस्त : अत्तरदे मनपासमोर उपोषणाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील खराब रस्त्यांच्या समस्येवरून भाजपचे पदाधिकारी चंद्रशेखर अत्तरदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी फोनवरून अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनपा आयुक्त व चंद्रशेखर अत्तरदे यांनीही वाद झाल्याची कबुली दिली असून, या वादानंतर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनासमोर पोलिसांसह मनपातील सिक्युरीटी गार्डचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने चंद्रशेखर अत्तरदे हे नगरसेविका रजनी अत्तरदे यांच्यासह मनपासमोर उपोषणाला बसले आहेत.
शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून, नागरिकांमध्ये खराब रस्त्यांच्या समस्ये विषयी मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड रोष पहावयास मिळत आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी नगरसेविका रजनी अत्तरदे यांच्याकडे तक्रारी मांडल्या होत्या. या तक्रारी मांडल्यानंतर रजनी अत्तरदे यांचे पुत्र व भाजपचे पदाधिकारी चंद्रशेखर अत्तरदे यांनी मंगळवारी रात्री मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना फोनवरून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी करत असताना आयुक्तांशी अरेरावीच्या भाषेचा वापर केल्याचा आरोप मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.
आयुक्तांच्या दालनासमोर पोलिसांचा बंदोबस्त
चंद्रशेखर अत्तरदे यांनी फोनवरून धमकी दिल्याची माहिती मनपाच्या विशेष सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मनपा आयुक्तांच्या तेराव्या मजल्यावरील दालनासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मनपाचे काही सिक्युरिटी गार्ड देखील तैनात करण्यात आले होते. याबाबत मनपा आयुक्तांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसली तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
भाजप नगरसेविकेचे उपोषण
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने, नागरिक त्रस्त आहेत. तसेच मनपाकडे देखील वेळोवेळी तक्रार करून देखील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात भाजप नगरसेविका रजनी अत्तरदे यांनी मनपासमोरच उपोषण पुकारले आहे. यावेळी चंद्रशेखर अत्तरदे, प्रवीण महाजन, मनोज झोपे, योगेश सोनार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व प्रभागातील नागरिक देखील उपस्थित होते. तसेच शहरातील रस्त्यांमुळे जर कोणाचा जीव गेला तर त्यास मनपा आयुक्त जबाबदार राहतील असेही अत्तरदे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोट..
शहरातील रस्त्यांची समस्या बिकट आहे. त्यावर मनपा प्रशासन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये रोष आहे हे देखील आम्ही मान्य करतो. तसेच समस्यांबाबत किंवा आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाला जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. तसेच त्याविरोधात आंदोलन करण्याचा देखील हक्क आहे. मात्र, हक्क मागत असताना, प्रशासकीय अधिकाऱ्याशी अरेरावी किंवा उद्धटपणे बोलणे चुकीचे आहे. अत्तरदे यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या मांडताना चुकीचे शब्द वापरले.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त
समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्तांना फोन केला. मात्र, त्यांनी समस्येचा निपटारा न करता आपण धमकी देत असल्याचा आरोप केला. नागरिकांच्या समस्या मांडण्याचा आणि त्या समस्यांचा निपटारा प्रशासनाकडून करवून घेण्याची आमची जबाबदारी असते. मात्र, प्रशासन त्यांच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच न्याय हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देणे जर धमकी समजली जात असेल, तर आम्ही मनपा विरोधात आंदोलन सुरु केले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आंदोलनाचाही मार्ग स्वीकारू.
-चंद्रशेखर अत्तरदे, भाजप पदाधिकारी