जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांच्या १२ ऑक्टोबर पासुन सुरु होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना वीज पुरवठ्याचा व्यत्यय येवू नये यासाठी जिथे लोड शेडींग केले जाते. त्या गावांमध्ये वेळा बदलण्याच्या सूचना महावितरणच्या प्रतिनिधींना करून होणाऱ्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन, महावितरण, परिवहन महामंडळ, पोलिस व आरोग्य विभाग यांनी सर्वतोपरी सहकार्य करून या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात असे आवाहन जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत परीक्षा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, महावितरणचे प्रतिनिधी एम.व्ही. चौधरी, अधिष्ठाता प्रा. ए.बी. चौधरी, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी. पाटील, उपकुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर आदी उपस्थित होते.
अंतिम वर्षासाठी ५३ हजार ५६४ परीक्षार्थी बैठकीच्या सुरुवातीला बी.पी. पाटील यांनी अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ५३ हजार ५६४ एवढी असल्याचे सांगितले यामध्ये ऑनलाईन पर्याय ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी तर ऑफलाईन पर्याय १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी निवडला असल्याची माहिती दिली. ऑफलाईनसाठी जळगाव जिल्हयात ७ हजार २९८ तर ऑनलाईनसाठी २१ हजार ९३४ परीक्षार्थी आहेत. जळगाव जिल्हयात ऑफलाईनसाठी ९४ परीक्षा केंद्र असणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले. कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी यावेळी विद्यापीठाच्या वतीने परीक्षांच्या पुर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाच्या वतीने सराव चाचण्या (मॉकटेस्ट) घेण्यात येत आहेत. याशिवाय मॉडेल प्रश्नसंच देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले.
महामंडळाने बसेसची पुरेशी व्यवस्था करावी... ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची पुरेशी व्यवस्था करावी अशीही सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केली. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून घेतली जावी, शक्य असेल तिथे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर परीक्षा देण्यासाठी सूचना कराव्यात, दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यक त्या परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा अशा सूचना श्री. गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांच्या प्रतिनिधींना केल्या. विद्यापीठाच्या पुर्वतयारी बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बी.पी. पाटील यांनी शेवटी आभार मानले.