बीएचआर : आज जामिनावर निर्णय
जळगाव : बीएचआर संस्थेत अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित सुरज सुनील झंवर यांच्या विरोधात मंगळवारी पुणे विशेष न्यायालयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दोषारोपपत्र दाखल केले आहे. दुसरीकडे याच घोटाळ्यातील संशयित महावीर जैन याला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सुनील झंवर यांची साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडिंग नावाने कंपनी आहे. या कंपनीत सुरज झंवर हा संचालक असून तो कंपनीचा भागीदार आहे. या कंपनीच्या नावाने निविदा भरून बीएचआरच्या कोट्यवधींच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर सुरज झंवर यास २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक केली होती. यानंतर त्याला २ फेब्रुवारीपर्यंत ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सद्यस्थितीत सुरज झंवर हा न्यायालयीन कोठडीत पुणे येथील कारागृहात आहे.
या घोटाळ्यातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. सुरज झंवर यानेही जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्याच्या जामिनावर गुरुवारी कामकाज होणार आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर महावीर जैन शहरात दाखल झाल्याचे सांगण्यात आले.