जुने जळगावातील विठ्ठल मंदिरात पहाटे काकडा आरती, महाअभिषेक व त्यानंतर महापूजा करण्यात आली. सकाळची महापूजा व महाआरती मंदिरातीलच सेवेकरी घनश्याम जोशी यांच्याहस्ते करण्यात आली. तर दुपारची महाआरती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विलास चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर भाविकांना कोरोना नियमांचे पालन करून, दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री मंदिरातील भजनी मंडळातर्फे भजन सादर करण्यात आले.
मेहरूण मंदिर विठ्ठल मंदिर
मेहरूण मधील विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीनिमित्त सकाळी महापूजा व आरती करण्यात आली. यानंतर कोरोना नियमांचे पालन करून, भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत होते. महापूजेनंतर हरिपाठ व भजनाचाही कार्यक्रम झाला. साधारणत : साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून, दरवर्षी आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने सर्व कार्यक्रम साजरे करण्यात आले.
श्री संत रूपलाल महाराज संस्थेतर्फे प्रसाद वाटप
पिंप्राळ्यातील विठ्ठल-रूख्माई बहुउद्देशिय संस्था व श्री संत रूपलाल महाराज देवस्थानतर्फे श्री विठ्ठल-रूख्मिणीच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अतुल बारी, सुभाष बारी, दिगंबर बारी, संभाजी बारी, भरत बारी, पंकज बारी, विजय बारी, दुर्गेश बारी व इतर भाविक उपस्थित होते.