जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान घरीच थांबावे लागत असल्याने कॉलनी भागांमध्ये त्या-त्या परिसरातील रहिवासी बाहेर फेरफटका मारत असून अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूविषयी गप्पादेखील रंगत आहेत. इतकेच नव्हे, तर वाढत्या कोरोनाविषयीदेखील चिंता व्यक्त केली जात असून बाहेर न पडता घरातच राहिलेले बरे, अशाही चर्चा रंगत आहे.
गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असून त्याच्या नियंत्रणासाठी जळगाव महापालिका क्षेत्रात जाहीर केलेल्या १२ ते १४ मार्च दरम्यानच्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील कॉलनी भागातील स्थितीचा आढावा घेतला असता नागरिक आपापल्या भागात थोडेफार फिरत असल्याचे आढळून आले.
मेडिकलवर वाढली ग्राहकी
जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी मेडिकलवर फारसी ग्राहकी नव्हती. मात्र, शनिवारी दुसऱ्या दिवशी गणेश कॉलनी या भागात पाहणीदरम्यान मेडिकलवर औषधी खरेदीसाठी ग्राहकी वाढली असल्याचे दिसून आले. यात मधुमेह,हृदयविकार, सर्दी, खोकला इत्यादी आजारांसाठी औषधी घेण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक आलेले होते.
शनि अमावास्येला कोरोना निवारणासाठी प्रार्थना
शनिवारचा दिवस व त्यात अमावास्या असल्याने महाबळ रस्त्यावरील शनि मंदिरात दर्शनासाठी भाविक आले होते. मंदिर बंद असले तरी भाविक बाहेरून दर्शन घेत होते. यात फूल, हार अर्पण करून कोरोना निवारणासाठी अनेकांनी प्रार्थना केली. महाबळ परिसरात यासाठी एक जण फूल विक्रीसाठीही बसलेला होता.
अजिंठा चौफुली ते नेरी नाक्यावर वर्दळ कायम
आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत वाहतूक सुरूच असल्याने महामार्गाकडून येणाऱ्या रस्त्यांवर वर्दळ आहे. यात अजिंठा चौफुली ते नेरी नाक्यावर वाहनांची वर्दळ कायम होती.
शतपावलीसाठी बाहेर
जनता कर्फ्यूमुळे अनेक जण बाजारपेठ व इतर भागात येत नसल्याने घरात बसून काय करावे म्हणून अनेक जण आपापल्या भागात फेटफटका मारत आहे. जनता कर्फ्यूमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला तर व्यवहार पूर्ववत होतील, अशा गप्पा गल्लोगल्ली रंगत आहेत. रामानंद नगर, गिरणा टाकी परिसर, काव्यरत्नावली चौक, शिव कॉलनी, पिंप्राळा, आयोध्यानगर, रायसोनी नगर, नेहरू नगर इत्यादी भागात असेच चित्र पहायला मिळाले.
पेट्रोलपंपावर शांतता
बाजारपेठ बंद असण्यासह नागरिकही घराबाहेर पडणे टाळत असल्याने पेट्रोलपंपावरही फारसी वाहने नसल्याचे चित्र आहे. वाहनांची संख्या घटल्याने पेट्रोलपंपावरील कर्मचारी बसून असल्याचे पहायला मिळाले.