जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या कापूस, सिंचन व सुवर्ण या व्यवसायांसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्याने या क्षेत्रातून त्याचे स्वागत होत आहे.
या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी चांगल्या घोषणा होण्यासह सूक्ष्मसिंचन तसेच सिंचन प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जळगावात पाईप, सिंचन तसेच प्लॅस्टिक उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने जळगावसाठी या घोषणा पूरक ठरणार असल्याचा सूर उमटत आहे. गेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे याही अर्थसंकल्पात शेतीसाठी मोठ्या घोषणा झाल्या. यंदा तर कृषीशी निगडित इतरही उद्योग, व्यवसायांसाठी चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सूक्ष्मसिंचनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने यातून सूक्ष्मसिंचनाला चालना मिळून बचतीलाही हातभार लागणार आहे. या सोबतच सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद ही मोठी उपलब्धी मानली जात असून याद्वारे या प्रकल्पांनाही चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयात शुल्कात कपात करीत वाढविला सेस
सुवर्ण व्यवसायावर जीएसटी कमी करणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने हा भार कायम राहणार आहे. मात्र आयात शुल्कात पाच टक्क्यांनी कपात केले आहे. हे करीत असताना आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर आले खरे, मात्र कोणत्याही घटकाच्या आयातीवर अडीच टक्के सेस लावण्यात येणार असल्याने सोने-चांदीवरील आयात शुल्क १० टक्क्यांवर राहणार आहे. परिणामी एका हाताने दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले, अशी स्थिती काहीसी आहे. मात्र अडीच टक्क्याने आयात शुल्क कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी होण्यास मदत मिळून व्यवसायवाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक कापसाला मिळणार वाव
अर्थसंकल्पात कापसावर १० टक्के आयात शुल्क लावण्यात आल्याने आयात कमी होऊन स्थानिक कापसाला वाव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामध्ये कापूस उद्योगाला प्रोत्साहन मिळून भावही चांगला मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
——————
कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांसह सूक्ष्मसिंचनासाठी १० हजार कोटी रुपयांची तसेच सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. या निर्णयाचे स्वागत करतो.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह जळगाव.
यंदाचा अर्थसंकल्प पाहिला असता तो सर्वसमावेशक आहे. सर्वच घटकांना त्याचा लाभ होणार असून सुवर्ण व्यवसायासाठी स्वागतार्ह अर्थसंकल्प आहे. आयात शुल्क कमी केल्याने त्याचा सर्वांनाच लाभ होईल.
- अजयकुमार, ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.
सूक्ष्मसिंचन तसेच सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या तरतूद केल्याने या प्रकल्पांनाही चालना मिळणार असून सर्वांनाच त्याचा लाभ होईल. यातून उत्पादन वाढीसही वाव आहे.
- रवींद्र लढ्ढा, पाईप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असोसिएसन.
कापसावर आयात शुल्क लावण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळे आयात कमी होऊन स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ होईल व भावही चांगला मिळेल.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग प्रोसेसिंग फॅक्टरी असोसिएशन.