रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळे ही एक प्रकारे फसवणूक असल्याने न्याय मिळण्याची मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तांदलवाडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स या विमा कंपनीकडून विमा काढला होता. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वेगळी रक्कम घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र केळी पिकाचे नुकसान होऊनदेखील रक्कम न मिळाल्याने आमची फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधी कुंदन बारी व मयूर पाटील यांच्याशी या संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विमा कंपनी आणि ज्यांनी पंचनामे केले ते कंपनी प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
भूषण चौधरी, कन्हैया महाजन, अमोल महाजन, निखिल महाजन, किरण पाटील, श्रीकांत चौधरी (सर्व रा. तांदलवाडी, ता. रावेर) यांच्यासह ७५ शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी, रावेर कृषी अधिकारी, तहसीलदार रावेर यांना निवेदने देण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही फॅक्स करून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. कृषिमंत्री दादा भुसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील, आदींनाही निवेदन दिले आहे.