लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : उपवर युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळणाऱ्या एका मोठ्या टोळीला बेड्या ठोकण्यात डाबकी रोड (अकोला) पोलिसांना शनिवारी यश आले. जळगाव आाणि नंदुरबार येथील दोन उपवर युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांनी या टोळीने गंडवल्यानंतर दोन महिलांसह पाच जणांना पोलीसांनी अटक केली.
वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथील रहीवासी सुदाम तुळशीराम करवते उर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके रा. सातमैल वाशिम रोड अकोला, संतोष उर्फ गोंडू सिताराम गुडधे रा. आगीखेड ता. पातूर, हरसींग ओंकार सोळंके रा. चांदुर ता. अकोला या तीन जणांसह दोन महिला एक जळगाव खांदेश येथील तर दुसरी अकोला येथील या पाच आरोपींना डाबकी रोड पोलीसांनी शनिवारी अटक केली.
या टोळीने लग्नासाठी मुली असल्याचे सांगत जळगाव आणि नंदुरबार येथील उपवर युवकास एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील करमुड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सानावणे पाटील या उपवर युवकास अकोल्यातील या पाच जणांच्या टोळीने सुंदर मुलींचे फोटो पाठवले व लग्नाचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत अतुल पाटील यांना एक लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पाटील यांनी २० हजारांची रक्कम देउन मुलगी दाखविण्याची मागणी केली. मुलगी दाखविल्यानंतर अतुल पाटील यांनी लग्नाची मागणी घातली असता आरोपींनी टाळाटाळ केली.
नंदूरबारमध्येही फसवणूक
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) यांच्यासोबतही घडला. मात्र यावेळी राहुल याचा मुलीशी विवाहही लावण्यात आला. मात्र मुलगी नवऱ्यासोबत जात असतानाच प्रभात किड्स शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत गावातील मुलींना पैसे देऊन घेऊन जात असल्याची आरडाओरड केली. त्यानंतर नवरी गाडीतून उतरली आणि आलेल्या युवकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.