लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सैन्य दलात नोकरीला लावून देतो, असे सांगून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या सचिन बाळासो डांगे व मोनिका सचिन डांगे (रा.भाडळी, ता.फलटण, जि.सातारा) या दोघांना चाळीसगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अटक केली.
चाळीसगाव तालुक्यातील शुभम गोरख पाटील (रा.वाकडी),प्रकाश कुमावत, गणेश निकम (रा.मुंदखेडे) व किरण कदम (रा.चांभार्डी) या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, या दोघांविरुद्ध एकाच वेळी फलटण व चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अमोल गुलाब पाटील, गुलाब निंबा पाटील (रा.वाकडी, ता.चाळीसगाव) या दोघांसह सचिन बाळासो डांगे व मोनिका सचिन डांगे (रा.भाडळी, ता.फलटण, जि.सातारा) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.
शुभम याच्याकडून ६ लाख ४० हजार, प्रकाश व गणेश यांच्याकडून प्रत्येकी दीड लाख व किरण कदम याच्याकडून ५ लाख रुपये असे एकूण १३ लाख ४० हजार रुपयात या तरुणांना चौघांनी गंडविले आहे. अमोल पाटील हा फलटन येथे सैन्य भरतीसाठी देण्यात येत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात कामाला होता. तेथे त्याची सचिन डांगे याच्याशी ओळख झाली. आपली सैन्य दलातील अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असून, तरुणांना नोकरीला लावून देण्याचे काम करतो, तुमच्याकडे कोणी तरुण मुले असतील तर त्यांचे काम करू, असे सांगून त्याने अमोलच्या माध्यमातून या चार तरुणांशी संपर्क साधून हा व्यवहार केला. चौकशीत चारही आरोपी एकमेकांच्या संपर्कातील असल्याने त्यांनी संगनमत करून या तरुणांना हेरुन फसविल्याचा प्रकार उघड झाला.