पारोळा : येथील एका केमिस्टकडे कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मागील महिन्यात मृत्यू झाला होता. याबाबत पारोळा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी वर्गणी जमा करून मयताच्या वारसास मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली.शहरातील सोनवणे मेडिकलवर कार्यरत असलेले ब्रिजेश नथू पाटील (४६) यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना पारोळा, अमळनेर, धुळे येथे उपचार देण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गरीब परिस्थिती असलेले ब्रिजेश पाटील यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने आभाळ कोसळले होते. याबाबत तालुका असो.च्या सर्व सदस्यांनी या कुटुंबास मदत देण्याबाबत एकमत करून मदतीचे आवाहन केले होते. त्यास सर्व सभासदांनी प्रतिसाद देत २१ हजारांची रोख रक्कम गोळा करून. ३ रोजी ब्रिजेश यांचे वारस मुलगा व पत्नीस ही रक्कम दिली. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील पाटील, नूतन अध्यक्ष मनीष पाटील, सचिव मुकेश गुजराथी, जिल्हा ई. सी. सदस्य अभय पाटील, शरद वाणी, नितीन देसले, छोटू सोनवण, तात्या पाटील व निकलेश वाणी उपस्थित होते.असे प्रसंग टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी व जिल्हा व तालुका असो ने सभासदांचा सामूहिक विमा, मेडिक्लेम असो. कडून काढावा, असे मत मांडले. तालुका असो.च्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी अभिनंदन केले.
पारोळा येथील केमिस्ट बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 3:35 PM