जळगाव : लॉकडाऊनचा कठीण काळ, त्यातही सर्वच क्रीडा स्पर्धा बंद, प्रशिक्षकांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झालेले असतानाही जळगावच्या भाग्यश्री पाटील हिने तिचा मोठा भाऊ आणि बुद्धिबळपटू प्रतीक पाटील याचे मार्गदर्शन आणि परिश्रम या जोरावर अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या १६ वर्षांआतील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून भाग्यश्री ही नाशिकला राहत आहे. १५ जून रोजीच या स्पर्धेचा निकाल समोर आला होता. मात्र अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन ही फेअरप्लेची तपासणी करण्यासाठी काही दिवस निकाल राखून ठेवते. त्यामुळे हा निकाल फेडरेशनने शुक्रवारी जाहीर केला. गेल्या दीड वर्षापासून भाग्यश्री ही कोणत्याही प्रशिक्षकाकडे जाऊन प्रशिक्षण घेऊ शकत नाही. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये स्पर्धादेखील होत नव्हत्या. त्यामुळे ती दिवसाचा काही वेळ बुद्धिबळ खेळण्यात घालवत होती. तीन महिने आधी एआयएसएफने या स्पर्धेची घोषणा केली. त्यामुळे भाग्यश्रीमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. मात्र खरी अडचण होती ती प्रशिक्षकाची. अशा काळात तिला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तिचा मोठा भाऊ आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या प्रतीक याने उचलली. तीला सातत्याने मार्गदर्शन केले. तसेच दोघांनी मिळून आंतरराष्ट्रीय फिडे मास्टर आणि जुन्या विश्व सामन्यांचा अभ्यास केला. कोणत्या खेळाडूने कोणत्या परिस्थितीत कोणती चाल रचली. याचे बारकावे पाहिले. ऑनलाइन आणि विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाग्यश्रीने सराव केला. बुद्धिबळाची संबंधित पुस्तके वाचली. सातत्याने सराव आणि अभ्यास याच जोरावर तीने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.
कोट -
भाग्यश्रीने या आधी सात वर्षे आतील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. आता पुन्हा एकदा ती यंदाही जेतेपद मिळवेल, असा विश्वास होता. गेल्या तीन महिन्यात ती ज्या पद्धतीने तयारी करत होती. ते पाहून ती नक्कीच यश मिळवेल, याची खात्री होती. - प्रतीक पाटील, भाग्यश्रीचा भाऊ.