अमळनेर (जळगाव) : तिच्या छातीत कळा येऊ लागल्या...लागलीच उलट्याही झाल्या...बोरी नदीला पाणी ...गावासाठी बोट उपलब्ध नाही ...नदीतूध बैलगाडी चालेना... अखेर तिला झोळीत टाकले ..तिला घेऊन पाच जणांनी नदी पार करून दिली...पण दुर्दैवाने दसऱ्याच्या दिवाशी सकाळी महिलेनं जगाचा निरोप घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील महिला उषाबाई रामलाल भिल (५३) यांचा मृत्यू झाला.
सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही. बोरी नदीवर पूल नाही. गावचे पुनर्वसन झाल्यामुळे विकास होत नाही. पुनर्वसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भवून देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासन म्हणते १७ किमी वर अमळनेरला नगरपालिकेत बोट आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. १७ किमीवरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तासाच्या वर कालावधी लागतो.
दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडे तीन वाजता उषाबाई यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. उलट्याही झाल्या. उजाडण्याची वाट पाहिली गेली. दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती. गावातील चार पाच लोकांना बोलावले. झोळी तयार करून उषाबाईंना झोळीत बसवून चार पाच जणांनी नदी पार केली. तोपर्यन्त बराच कालावधी उलटला होता. अमळनेरला आणले प्रकृती अत्यवस्थ म्हणून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रशासनाने सात्री पुनर्वसनाची आवश्यक निधीची तरतूद करून तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याचा मार्ग त्वरित काढावा. आणखी किती बळी जाण्याचा प्रशासन वाट पाहत आहे?महेंद्र बोरसे,माजी सरपंच, सात्री ता. अमळनेर