ऑनलाईन लोकमत
बिडगाव, ता. चोपडा,दि.3 - कुंडय़ापाणी येथील आश्रमशाळेत पाचवीत प्रवेश घेण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आश्रमशाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे.
शेवरे बुद्रूक येथे चौथीर्पयत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी इतरत्र जावे लागते. मात्र काही विद्यार्थी कुंडय़ापाणी येथील ताराबाई बहुउद्देशीय संस्था संचलित आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यात दुर्गाबाई जयसिंग बारेला (11) हीदेखील प्रवेश घेण्यासाठी दाखल झाली होती. ती शाळेत मुक्कामी होती. ती शाळेत अचानक आजारी पडली. तिला शाळा प्रशासनाने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे असताना तसे न करता पालकांकडे शेवरे येथे सोडले.
दुस:या दिवशी तिला पालकांनी अडावद येथे खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी दुस:या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र पैशांची जमवाजमव करून उद्या घेऊन जाऊ म्हणून तिला घरी परत आणले. 29 रोजी रात्रीच या मुलीचा घरी मृत्यू झाला. मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला, त्याचे कारण समजू शकलेले नाही.
तीन दिवसांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून रविवारी या शाळेत तिचे काका देवा बारेलासह ग्रामस्थ व पत्रकार चौकशीसाठी गेले असता ती शाळेतील अपंगांसाठी असलेल्या रॅम्पवर आदळल्याचे समजले. मात्र शाळा प्रशासनाने कुठलीही सहानुभूती न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.
एकनाथ पाटील या कर्मचा:याने मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे संतापलेले पालक व नातेवाइकांनी सायंकाळी अडावद पोलीस ठाण्यात जाऊन सहायक पोलीस निरीक्षकांकडे आपली कैफियत मांडली.
शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप पालक जयसिंग बारेला व ग्रामस्थांनी केला.
चौकशी करणार - जयपाल हिरे
याबाबत अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुलीचे नातेवाईक आले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. याबाबत योग्य ती चौकशी करणार आहोत.