समर्थ रामदास यांच्याविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं होत. भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानानंतर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र या विधानाबाबत कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. मला जितकी माहिती होती, त्यानुसार समर्थ रामदासजी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. परंतु, इतिहासाचे काही नवीन तथ्य मला सांगितले. ती तथ्य मी पाहीन', अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचं उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, ‘राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे,’अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
अमुक एक नसते तर शिवाजी महाराज घडले नसते, असं कोश्यारी म्हणालेत; पण ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, त्यांनी इतिहास वाचला असता तर ते तसे बोलले नसते. एखाद्याचा हात पकडू शकतो. तोंड नाही. शब्द हे शस्त्र असतात. ते समजून बोलावे. वयाने ते मोठे आहे, निदान त्यांनी तरी वक्तव्य मागे घ्यावे. अनेकांचे फोन आले. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.