चंद्रशेखर जोशीजळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा काय देऊन गेला, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणतीही मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर एक भावना नेहमी जनमानसात दिसून येते. ती म्हणजे ही व्यक्ती देणार काय? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश हा विकास योजनांचा आढावा घेणे हा होता. त्या अनुषंगाने समोर येणाºया विषयांचा त्यांनी उहापोह करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या दौºयात केवळ अधिकारी वर्ग, पालकमंत्री किंवा तत्सम विभागांशी संबंधीत मंत्री त्या जिल्ह्यातील असेल तर तो अपेक्षित होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींना निरोप दिले जाणे अपेक्षित होते. मात्र जळगावात तसे झाले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला मानापमानाचे ग्रहण लागले. बैठकीस आलेल्या काही लोकप्रतिनिधींना पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी अडविले. येथून ठिणगी पडली. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत जे येत असतील त्यांना येऊ द्या अशी सूचना दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षातील एकदोन वगळता सर्वच मंत्र्यांनी बैठकीत प्रवेश केला. मुख्यमंत्री येणार...समोर अधिकारी वर्ग व आपण व्यासपीठावर असणे ही फार मोठी बाब... (लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने) त्यानुसार त्यांची भूमिका या ठिकाणी दिसली. तब्बल चार ते साडेचार तास मॅरेथॉन बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाचे सावट आतापासून जाणवू लागले आहे. जिल्ह्यात जेमतेम ६५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्री मांडतात याबाबत लोकप्रतिनिधींना जास्त उत्सुकता होती. सिंचनाचा अनुशेष, निधीचा अनुशेष ही नित्त्याची बाब आहे. निधीच्या घोषणा या नेहमीच्याच. जलयुक्त शिवार अतिशय चांगली योजना पण पाऊसच पडला नसेल तर योजनेचा उपयोग तो काय? हीच स्थिती यंदा जिल्ह्यात आहे. गेल्या तब्बल चार वर्षांपासून दुष्काळामुळे जिल्ह्यातील बळीराजा होरपळत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती, बोंडअळीचे प्रताप सतावत असतात. यामुळे जे उत्पादन येणार तेदेखील अडचणीत येते. यंदा खरीप जेमतेम ५० टक्के येईल असा अंदाज आहे. रब्बीची आशा फारशी नाही. त्यामुळे काही दिलासादायक चित्र मुख्यमंत्र्यांनी उभे करणे अपेक्षित होते. नेमके ते झाले नाही. आता दिवाळी तोंडावर आहे. हा काळ उत्साहाचा त्यात काही दिले गेले असते तर फारचे चांगले झाले असते...अशाच प्रतिक्रीया उमटत आहेत.
मुख्यमंत्री आले अन् गेले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 7:02 PM