भाजपामध्ये सध्या 'इनकमिंग' जोरात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकारीही भाजपाचा झेंडा हाती घेत आहेत. एकेकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपा पक्षात घेत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जाते. तोच धागा पकडत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्मिक टिप्पणी केली होती. 'भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात?', असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी आज जशास तसं प्रत्युत्तर दिलं. भुसावळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही', असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
'नापास झालात तर पेन जबाबदार कसा?'
एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर पेन जबाबदार कसा असू शकतो?, असं विचारत मुख्यमंत्र्यांनी, ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांना चपराक लगावली. लोकसभेच्या आधी विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत होते. परंतु, त्याचा काही उपयोग होणार नाही, हे आता जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांना कळून चुकलंय. ही गोष्ट लवकरच राज्यातील नेत्यांनाही कळेल, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणं अयोग्य असल्याचं मत मांडत जयराम रमेश आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे. मोदी सर्वसामान्यांना जोडणाऱ्या भाषेत बोलतात. मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. तसेच कायम त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे रमेश यांनी नमूद केले आहे.