लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून निर्बंधांचे पालन करणाऱ्या व्यापारी बांधवांची सहनशीलता आता संपली आहे. आता व्यापाऱ्यांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित करीत जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घालण्यात आले आहे. जळगावात दोघांचे तब्बल ५०० पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले असून त्याद्वारे विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.
नॉन इसेंशियल व्यापाऱ्यांना समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या
वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने पूर्ण जळगाव शहरात मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आम्हाला वाचवा, नॉन इसेंशियल व्यापाऱ्यांना समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे संदेश असलेले पोस्टर जागोजागी लावण्यात आले आहेत.
५०० पोस्टरद्वारे वेधले लक्ष
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे शहरात ठिकठिकाणी ५०० पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये मुख्यमंत्री महोदय व्यापाऱ्यांनी दुकानाचे भाडे कसे भरायचे? बँकेचे हप्ते कसे भरायचे? पगार कुठून द्यायचा? खायचं काय ? आणि जगायचे कसे ? शासकीय कर, वीज बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी भरायची कुठून असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
आता मात्र आम्ही हतबल झालो
१५ महिन्यापासून आम्ही सहकार्य करीत आहोत आता मात्र आम्ही हतबल झालो आहोत. पालकमंत्री मंत्री महोदय तुम्ही आमचे पालक आहात कृपया आमच्या वाढत असलेल्या अडचणी समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे.