कुंदन पाटील, जळगाव-सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरु होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करु नका, अशा शब्दात इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे इशारा दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंघ भारताला कुणीही रौखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोद्री ता.जामनेर येथे आयोजित अ.भा.हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा, द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी , सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज,बाबुसिंगजी महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
छेडछाड सहन करणार नाही
हा 'कुंभ आहे.कुंभाचा भाव म्हणजे सर्वसमावेशक कामनापूर्ती आणि सिद्धीपूर्ती.बंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्मघेतल्याचे सिद्ध केले आहे.सनातन हा मानवता धर्म आहे.सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे.त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले.देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित.म्हणूनच 'अतिथी देव भव' हा आमचा स्वभाव गुण आहे.त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे.मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला.
देशात दोन संविधान - रामदेवबाबा
देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे.मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे.त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरु रामदेवबाबा यांनी यावेळी केले.हिंदू धर्म विश्व धर्म आहे.सनातन धर्माची ताकद आणि मुल्यांना कुणीही हात लावू शकत नाही.धर्मांतराची भीक स्वीकारु नका.आपला 'डीएनए' सनातन धर्माचा आहे.त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिंदे-फडणवीस अचानक माघारी
दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले.मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी यावेळी जाहीर केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"