ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25- निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पित्याने सलग तीन दिवस घरात डांबून ठेवलेल्या सोहेल रिंकू तडवी (6) या दिव्यांग बालकाची सुटका करुन पोलीस कर्मचारीच त्या बालकाची जिल्हा रुग्णालयात देखभाल करीत आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रिंकू तडवी हे पत्नी व मुलासह पोलीस लाईन परिसरात राहतात. मुलगा सोहेल हा दिव्यांग व मतीमंद आहे. काही दिवसांपूर्वी तडवी यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची पत्नी माहेरी गेलेली आहे. गेल्या आठवडय़ात रिंकू तडवी हे सोहेलला घरात बंद करून निघून गेले. तीन दिवस झाले तरी मुलगा घरात भुकेला व तहानलेला होता. मुलगा रडत असल्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली व याबाबत जिल्हा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तेथे जाऊन सोहेलला जिल्हा रुग्णालयात हलविले. आठवडाभरापासून दोन पोलीस कर्मचा:यांकडून देखभालगेल्या आठवडय़ात सोहेलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हापासून जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक धनराज निकुंभ व कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे येथे थांबून या बालकाची देखभाल करीत आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे स्वत: येथे अधून-मधून येऊन बालकाची विचारणा करीत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीही या दिव्यांग मुलाच्या देखभालीसाठी हातभार लावीत आहे. जळगावातील ‘खाकी’ची ही माया पाहून पोलिसांचे कौतुक करीत आहे. जिल्हा रुग्णालयात जामनेर तालुक्यातील भराडी येथील एक बालक दाखल असून त्याच्या सोबत मनुबाई सीताराम कोळी या बालकाच्या आजी आहे. या ठिकाणी सोहेलला दाखल केल्यानंतर तो कोणाच्या हातून जेवण करीत नसल्याने व काहीही खात पित नसल्याने मनुबाई कोळी यांनीच या बालकाला जवळ घेत त्याला घास भरविण्यास सुरुवात केली. या आजीचा सोहेलला लळा लागला असून अजूनही तो कोणाच्याही हातून न खाता-पिता केवळ याच आजीच्या हातून जेवण करीत आहे. सोहेलला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनीच सोहेलच्या वडिलांचा शोध घेतला. त्यावेळी भजे गल्ली परिसरात आढळून आले. मुलगा जिल्हा रुग्णालयात असल्याने रिंकू तडवी हे त्या ठिकाणी जाऊन मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेथे तैनात पोलीस त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत आहे.