लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुम्हा पती-पत्नीत काय झालं ते तुम्हाला माहिती आहे, परंतु तुमची ही एक चूक मुलांना भोगावी लागत आहे. तुम्हीच तुमचा संसार उद्ध्वस्त केला आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारी वकील विद्या राजपूत यांच्या पतीला गुरुवारी न्यायालयात निकाल सुनावताना फटकारले.
दरम्यान, ज्यांचा खून केला त्या सरकारी वकील होत्या. तुम्ही एक डॉक्टर. तुमचे वडील पोलीस पाटील दोघांनाही कायद्याचे ज्ञान आहे. या घटनेत निकाल देताना फाशीचा विचार केलेला नाही. तुम्हाला जाणीव व्हावी व समाजात योग्य संदेश जावा म्हणून मधला मार्ग काढून पोलीस पाटील असलेले सासरे लालसिंग पाटील याला कलम २०१ अन्वये चार वर्षे कैद व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पती डॉ. भरत पाटील याला ३०२ अन्वये जन्मठेप, एक हजार रुपये दंड व २०१ अन्वये चार वर्षे कैद व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. यात पोलीस कोठडीचा कालावधी वगळला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
पती म्हणाला, मुलांचा तर सासरा म्हणाला, वयाचा विचार करा
दोन्ही आरोपींना दोषी ठरविल्यानंतर न्यायाधीश लाडेकर यांनी शिक्षेबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? अशी विचारणा केली असता, त्यावर पती डॉ. भरत पाटील याने न्यायालयापुढे दोन्ही हात जोडून माझ्या मुलांचा विचार करा, आई-वडील म्हातारे आहेत, कमीतकमी शिक्षा द्या, अशी विनवणी केली तर सासरा लालसिंग पाटील याने माझे वय झालेले आहे. मला शौचास व जेवणाला बसता-उठता येत नाही. त्रास होतो, पत्नी सतत आजारी असते, अशी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली.
सरकारी वकील म्हणाले, मुलांचे भविष्य अंधकारमय केले
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी शिक्षा कमी व्हावी म्हणून मुलं व वयाचे कारण सांगितलं आहे. मुळात घटना घडल्यापासून मयताची मुलं ही औरंगाबाद येथे मावशीकडे असून तेथे शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय सासरा लालसिंग पाटील हा प्रत्येक तारखेला वेळेवर हजर आहे, त्यामुळे त्याची प्रकृती ठीक नाही, असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. पतीने तर मुलांचे भविष्य अंधकारमय केले आहे.
न्यायालयाने व्यक्त केली मुलांची चिंता
आईचा मृत्यू तर वडील कारागृहात अशा परिस्थितीत मुले पोरकी झालेली आहे. विद्या राजपूत यांचा सरकारी वकील म्हणून एक वर्षाच्या वर कार्यकाळ झालेला होता. त्यामुळे कायदेशीररीत्या या मुलांना फॅमिली पेन्शन मिळू शकते, त्यासाठी जवळच्या नातेवाइकांना सरकारी वकिलांनी मदत करून त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही दिल्या.
साक्षीदार घरातलेच, वैर असण्याचे कारण नाही!
या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने महत्त्वाचे साक्षीदार घरातलेच व नातेवाईक आहेत. त्यांचे तुमच्याशी वैर असण्याचे कारण नाही. घटना घडली तेव्हा तुम्ही पती, पत्नी असे दोघेच घरात होते. कार्यक्रमाला जायचे होते असे आधीच तुमचे ठरलेदेखील होते. मुलाने आईला पाहिले तेव्हा तिची कुठलीच हालचाल होत नव्हती. याशिवाय दवाखान्यात व नातेवाइकांना विद्या यांच्या मरणाची कारणे वेगवेगळी सांगितली आहेत. त्यापैकी शवविच्छेदन अहवालात एकही कारण नमूद नाही तसेच सर्वांचे मोबाइल लोकेशन घटनेशी जुळून येत आहेत. ओढणी व उशी यांचा फॉरेन्सिक अहवालदेखील जुळून आलेला आहे, या सर्व पुराव्यांवरून डॉ. भरत यांनीच पत्नी विद्या राजपूत यांचा खून केल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने सांगितले.