समाजात जिथे जिथे दांभिकतेचे दर्शन होते, तिथे तुकोबांच्या लेखणीला विलक्षण धार चढते. खोटी प्रतिष्ठा, ढोंगीपणा आणि दांभिकपणावर कोरडे ओढणारे अनेक अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये आढळतात. इसापनितीमध्ये डबक्यातल्या बेडकाची गोष्ट आहे. संपूर्ण आयुष्य एकाच डबक्यात घालवलेल्या बेडकाला आपल्यापेक्षा कोणीच मोठे असू शकत नाही, असे वाटू लागते. त्या डबक्यात पाणी प्यायला आलेला बैल पाहून घाबरलेली लहान बेडके जेव्हा या मोठ्या बेडकाला आपण एक मोठा प्राणी पाहिल्याचे सांगतात तेव्हा तो स्वत:चे अंग फुगवून एवढा मोठा होता का तो प्राणी असे विचारतो. ‘नाही तो खूपच मोठा होता,’ असे सांगितल्यावर तो स्वत:मध्ये पुन्हा हवा भरून फुगत राहतो आणि उत्तरोत्तर पुन्हा फुगून शेवटी फुग्यासारखा फुटतो. बेडूक फुगून फुगून केवढा मोठा होणार? तो बैलाएवढा तर होवू शकत नाही. पण फुगण्याच्या नादात त्याचा अंत मात्र निश्चित होतो. इसापनितीतील ही कथा त्या बेडकाची आहे. आपल्या अवती- भवती अशी असंख्य माणसे कुपमंडूक वृत्तीने जगत असतात. कुप म्हणजे विहीर. विहीरीच्या बाहेरही जग आहे, हे माहित नसलेल्या त्या बेडकाला त्या विहीरीच्या परिघातच संपूर्ण विश्व सामावलेले आहे, असे वाटत असते. त्याप्रमाणे मी, माझे कुटुंब आणि फार झाले तर माझे नातेवाईक यांच्या पलिकडे ज्यांची दृष्टी जाऊ शकत नाही, त्यांच्या मनात ‘विश्वाचे आर्त’ कसे प्रकाशणार? ‘ हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक वृत्ती जगण्यासाठी संतांच्या चरित्राचा आणि संत वाङमयाचा अभ्यास करून त्यांचा संदेश आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. मी आणि माझे यांच्या सीमा ओलांडून आपण जेव्हा जगाकडे पाहू लागू, तेव्हा या विश्वपसाऱ्यातले माझे स्थान काय आहे, याचे भान येऊ शकेल. मग खोट्या अलंकारांची वस्त्रे आपोआप गळून पडतील.‘बैसुनी थिल्लरी। बेडूक सागरा धिक्कारी।।मुलाम्याचे नाणे। तुका म्हणे नव्हे सोने।।तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यांना हेच सुचवायचे असते. धन, सत्ता, सौंदर्य आणि विदवत्तेचा मुलामा फार काळ टिकत नसतो. मुलामा चढवलेला दागिना सोन्यासारखा वाटतो खरा; पण तो सोन्याचा नसतो तो सोनारालाही माहित असते आणि आत्मपरिक्षण केले तर आपल्यालाही कळून चुकते. मग दांभिकपणाचा बुरखा धारण करण्याची आवश्यकता उरत नाही.- प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव.
मुलाम्याचे नाणे, तुका म्हणे नव्हे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:42 PM