कळमसरे, ता.अमळनेर : एकुलत्या एक मुलाचे अवघ्या अठराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. एवढा मोठा दु:खाचा धक्का पचवत, मुलाने पुन्हा हे जग पहावे, कोणाच्या न कोणाच्या रूपात मुलाची नेहमी आठवण रहावी या उदात्त विचाराने आई, वडिलांनी मयत मुलाचे नेत्रदान करून सामाजिक दायित्व जोपासले.हा हृदय हेलावणारा प्रसंग अमळनेरच्या अयोध्या नगरीत शनिवारी संध्याकाळी घडला. मूळ चिरणे, ता.शिंदखेडा येथील रहिवाशी, कळमसरे गावाचे जावई संजय निंबा चौधरी हे विमा एजंट म्हणून तर पत्नी प्रतिभा शासकीय आय.टी.आय. शिक्षिका असून हे दांपत्य अमळनेरात स्थिरावलेले आहेत. जन्माने अपंगत्व लाभलेला मनीष (१८) हा त्यांचा एकुलता मुलगा..! नुकताच ६९ टक्के गुण मिळवून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला, मित्र मंडळींचा मोठा गोतावळा, हुशार असल्याने आई वडीलांना, नातेवाईकांना मोठे भूषण वाटत असे.पण अल्पशा आजाराने त्याचे नुकतेच अकाली निधन झाले. मृत्यू हा अटळ आहे हे त्रिकाल सत्य स्वीकारून कुटुंबाशी चर्चेअंती आई, वडीलांनी एकुलत्या मनीषचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नर्मदा फाउंडेशनचे डॉ.संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाने रोटरी क्लबमार्फत नेत्रतज्ज्ञ डॉं.राहुल मुठे यांनी मनीषचे दोन्ही नेत्र स्वीकारल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा निघाली. मनीष हा कळमसरे येथील संताजी मंडळाचे अध्यक्ष रमेश चिंधा चौधरी यांचा नातू होत.
आई-वडिलांनी केले मुलाचे नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 4:48 PM