लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन दिवसांपासून नवजात शिशू काळजी कक्ष विभागात दाखल एका बालकाला व्हेंटिलेटर लागत असताना ते खाली नसल्याचे डॉक्टरांकडून पालकांना सांगण्यात आले होते. अखेर त्यांनी मंगळवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी स्वत: कक्षात जाऊन अन्य कक्षातील व्हेंटिलेटरची या बालकासाठी व्यवस्था करून दिली.
गेल्या काही दिवसांपासून नवजात शिशू कक्षात उपचारासाठी येणाऱ्या बालकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी १५ व्हेंटिलेटर आहेत. मात्र, बालके गंभीरावस्थेत या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यातच भानखेडा, ता. जामनेर येथील एका २५ दिवसांच्या बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला रविवारी २९ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशू काळजी कक्ष विभागात दाखल करण्यात आले होते. शेंदुर्णी येथे या बाळाचा जन्म झाला. सुरुवातीचे काही दिवस तो घरी होता. मात्र, त्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यास या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले होते. दोन दिवसांनी अखेर पालकांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन ही परिस्थिती मांडली. त्यांनी तातडीने या कक्षात जाऊन अन्य कक्षातून स्वत: दुसरे व्हेंटिलेटर आणले.