जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मधून जेवणाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी गेल्या आठवडाभरापासून समोर येत आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शनिवारी थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन या जेवणाची चव घेऊन हे वास्तव तपासले. यात ३ चपात्या डाळ आणि भात आणि दोन केळी असे जेवण दुपारी बाराच्या सुमारास रुग्णांना प्राप्त झाले होते. यातील डाळ थोडी तिखट होती, चपाती भाताची गुणवत्ता बरी होती. मात्र यात थोडी सुधारणा आवश्यक असल्याचे चित्र आहे. पौष्टिकतेच्या दृष्टीनेही विचार होणे आवश्यक आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्र ४ वर सकाळी ११ पासून पाहणी केली असता. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांसोबत दाखल होणाऱ्या रुग्णांची रांग लागलेली होती. तासाभरात ही इमारत फुल्ल झाली होती. बाहेर एक परिचरिका रुग्णांची नोंदणी करीत होत्या. ११.३० वाजेच्या सुमारास एका मालवाहू रिक्षात जेवणाची पाकीट आले. सर्वात मागच्या इमारतीत तेथे जेवणाचे पाकीट वाटप केल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते केंद्र क्रमांक चारवर पोहोचले. या ठिकाणी काही मुलांनी जेवण्याचे पाकीट खाली उतरवले. रूग्णांना हाका मारण्यात आल्या. त्यानुसार रुग्ण खाली आले. रुग्णांना गर्दीत उभे करून ताट तयार करून त्यात एक वाटी ठेवून जेवणाचे पाकीट ठेवण्यात आले. हे ताट घेऊन रूग्ण आपापल्या खोलीत गेले. काही दिवसांपूर्वी प्रचंड प्रमाणात तक्रारी वाढल्याने अखेर यात बदल करण्यात आल्याची माहिती आहे.
काय होते जेवण
मसाले, तूर डाळ, भात आणि ३ चपात्या यासोबत दोन केळी यात चपात्या या बऱ्यापैकी नरम होत्या. याची चव चांगली होती मात्र नेहमीच्या मानाने थोडी तिखट डाळ होती. कोविडमध्ये रुग्णांची चव जात असल्याने त्यांना अन्नाची चव लागत नसल्याचे जेवण वाटप करणाऱ्यांनी यावेळी सांगितले.
प्रमाण कमी
सकाळचे जेवण व रात्रीचे जेवण यात साधारण सात ते साडेसात तासाचे अंतर असते, मात्र यात तीन पोळ्या, थोडा भात आणि डाळ आणि दोन केळी हे प्रमाण थोडे कमी असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तरुणांसाठी हे जेवण कमीच असल्याचे काही तरुणांनी सांगितले.
थेट सीसीतील अनुभव
सकाळी नाष्टा, दुपारी ११.३० ते बाराच्या दरम्यान जेवण, ४ वाजता चहा, सायंकाळी ७ ते ७.३० वाजता जेवण असा आहाराचा क्रम असतो. स्वछता ठेवली जाते, पाण्याची समस्या क्वचित उद्भवते, कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली आहे.
फक्त गोळ्या घ्या
या ठिकाणी केवळ सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनाच दाखल करण्यात येते त्यामुळे पाच दिवसांच्या गोळ्या देण्यात येतात. नंतर काही त्रास झाल्यास ती औषधी देण्यात येते, डॉक्टर मात्र तपासणीला जात नाही. सगळ्यांना एकत्रित खाली बोलवून विचारणा होते.