महाराष्टÑात सर्वदूर परिचित असलेली नंदुरबारची मिरची आणि त्यावर सुरू असलेले येथील उद्योग सध्या ‘कोरोना’मुळे थंडावला आहे. परिणामी त्यावर आधारित सुमारे पाच हजार मजुरांचे हातही विसावले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होत आहे. गेल्या महिनाभरात हा उद्योग बंद असल्याने येथील कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण ठप्प झाले आहे.नंदुरबार म्हटले म्हणजे त्यासोबत येथील मिरचीचे नाव जोडले गेले आहे. देशात तामिळनाडूतील गुंटूरनंतर महाराष्टÑातील नंदुरबार येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. हंगामात रोज सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक सुरू असते. ओली मिरची खरेदी करून व्यापारी ते जमिनीवर वाळवतात. त्यामुळे मिरची वाळवण्यासाठी लागणाऱ्या पथाºया म्हणजे लक्षवेधी. लांब लांब दृष्टी जाई तोपर्यंत लालच लाल मिरचीचा सडा नजरेस पडतो. जसे लाल गालिचे टाकले असल्याचा भास होतो. ही वाळवलेली मिरची नंतर मिरची उद्योगात त्याची पावडर केली जाते आणि देशातील विविध भागात ती विक्री होते. नंदुरबार शहरात मिरची पावडर तयार करणारे सुमारे चाळीसपेक्षा अधिक उद्योग असून येथील मिरचीला सर्वदूर मागणी आहे.सध्या मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उद्योगच बंद पडले आहेत. अर्थात मिरची पावडर उद्योग हे कृषीवर आधारित असल्याने सरकारची त्याला परवानगी असली तरी कोरोनामुळे आलेली बंधने आणि नियम पाळताना अनेक अडचणींना उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा बंद असलेलेच बरे, अशी अवस्था उद्योजकांची झाली आहे. पण उद्योग बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेले जवळपास पाच हजार मजूर आज बेरोजगार झाले आहेत. उद्योगच बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे अर्थकारणही ठप्प झाले असून आता कधी एकदाचे कोरोनाचे संकट दूर होईल अन् उद्योग सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.-रमाकांत पाटील, नंदुरबार
मिरची उद्योगाला ‘कोरोना’चा ठसका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:13 AM