ऑनलाईन लोकमत चोपडा, दि.29 - गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या..असा जयघोष करीत येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून सुरवात झाली. दुपारी 3 वाजेर्पयत 52 पैकी पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे तापी नदीपात्रात विसर्जन झाले होते. चोपडा येथे पाचव्या दिवशी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होत असते. मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. गोलमंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. या मिरवणुकीत विवेकानंद विद्यालयातील 9 वी व 10 वीच्या विद्यार्थीनींनी लेझीमचे सादरीकरण करून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.
अनेक मंडळांनी ढोल-ताशे लावले होते. विसर्जन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून शिवाजी चौकाकडे येत होती. तेथून गणेश मंडळे आपल्या श्रींची मूर्ती तापी नदीवर विसर्जनासाठी घेऊन जात होते. सर्वात प्रथम तहसील कार्यालय परिसर चौकातील राणी लक्ष्मीबाई गणेश मित्र मंडळाचा गणपती विसर्जन झाले. गुलालाऐवजी मंडळाच्या कार्यकत्र्यांवर नागरिक फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत होते. विसर्जन मिरवणूक सुरू असतांनाच पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंद संचारला होता.