गेल्या महिन्यात पाइप लाइन खोदण्याच्या प्रक्रियेत महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन सर्व तयारीनिशी गेले असता पोलीस आणि कठोरा येथील ग्रामस्थ यांच्यात वाद झाला. त्यामुळे काम खोळंबले; अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठीची पाइप लाइन पूर्ण झाली असती. या भागात तापी नदीवरील पाण्यावर केवळ कठोरा ग्रामस्थांचा हक्क असल्याचा काहींचा दावा आहे. जिल्हा प्रशासन प्रचंड पोलीस ताफ्यासह कठोरा गावात येण्याआधीच कठोरा ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
६८ कोटींचा निधी प्राप्त
चोपडा शहराची लोकसंख्या जवळपास एक लाख असून, त्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने ६८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्षे ते दीड वर्षाचा कालावधी असताना जवळपास तीन वर्षे लोटली तरीही शहरवासीयांना या योजनेचा लाभ झालेला नाही. त्यातच पुन्हा पाणी उचल करण्यासाठी कठोरा येथील ग्रामस्थांनी नवीन टाकल्या जाणाऱ्या पाइप लाइनलाच विरोध केल्याने काम थांबले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गेल्या महिन्यात ग्रामस्थांनी पाइप लाइन टाकू द्यावी याबाबत चर्चा केली. मात्र, चर्चेतून काहीही तोडगा समोर न निघाल्याने प्रकरण ‘जैसे थे’ आहे.
पाइप लाइनचा विषय
जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
सध्या कठोरा येथील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यावा व कठोरा येथे यावे, असा आग्रह धरलेला आहे. मात्र, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही.
माजी आमदार कैलास पाटील
यांची भूमिका महत्त्वाची
दरम्यान, चोपडा नगरपालिकेवर शहर विकास मंचची सत्ता असून, शहर विकास मंचमध्ये कठोरा येथील रहिवासी व माजी आमदार कैलास पाटील हेही प्रमुख नेते म्हणून सहभागी आहेत. म्हणून माजी आमदार कैलास पाटील यांनी स्वतःचे कठोरा गाव आणि चोपडा शहरातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून मध्यस्थीची भूमिका करून हे प्रकरण निवळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
----
तडजोडीची भूमिका आवश्यक
नगरपालिका प्रशासनानेही तडजोडीची भूमिका ठेवून एक पाऊल मागे येऊन सकारात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कठोरा गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भविष्यात निर्माण होऊ शकते. असा समज निर्माण झाल्याने ही तेढ निर्माण झालेले आहे. तिढा सोडवण्यासाठी सर्व जबाबदार असलेल्यांनी व संबंधितांनी एकत्र येऊन चोपडेकरांचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.