गत काळात कारखान्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने चोरटे आणि भामट्यांनी कारखान्यातील विविध प्रकारची सामग्री लंपास केलेली आहे. एवढेच नाही तर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर भव्य असे श्री दत्ताचे मंदिर उभारलेले होते. या मंदिराचीही दुरवस्था झालेली होती. मात्र, तीन वर्षांनंतर अखेर सर्वपक्षीय नेते, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या प्रयत्नाने पुन्हा कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणार असल्याने व चाकांची धडधड सुरू होणार असल्याने परिसराला पुन्हा वैभव प्राप्त होणार आहे.
भाडेतत्त्वावर का असेना परंतु कारखाना सुरू होणार हे मात्र तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे. यासोबतच हजारो कामगारांना कारखाना सुरू झाल्यानंतर रोजगार उपलब्ध होणार आहे.
-----
प्रतिदिन अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता
साखर कारखान्याची प्रति दिवस अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. तीन पाळ्यांमध्ये जर नियमित कारखाना सुरू राहिला तर दररोज अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप होऊ शकतो. तसेच सहवीज प्रकल्पातून शेकडो युनिट दररोज वीज निर्माण होते. गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्यातील सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली वीज वितरण कंपनीला विकून कारखान्याला पैसेही मिळायचे आणि कारखान्याने वापरलेल्या विजचे बिल फेडून कारखान्याला पैसे मिळायचे. प्रति दिन अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने कार्यक्षेत्रातूनच ऊस उपलब्ध होत असतो. परिसरातही ऊसासाठी पोषक वातावरण असल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्याने पाच ते सहा लाख टन ऊस एका हंगामात गाळप केलेला आहे.
-----
हजारो कामगारांना मिळणार रोजगार
कारखान्यात नियमित वेतन श्रेणीवर जवळपास दोनशे ते सव्वादोनशे कामगार कामास असतात. तसेच ऊस वाहतूक व ऊस तोडणी मजुरांपासून तर कारखाना सुरू झाल्यानंतर लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे असे एकूण जवळपास एक हजारांच्यावर बेरोजगारांना दररोज रोजगार उपलब्ध होणार आहे.
----
मोठ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र
चहार्डीसह परिसरात शेकडो एकर जमीन असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान ठरणार आहे. कारण मजुरांची वाढलेली मजुरी व जाणवणारा मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. अशा परिस्थितीत जर मोठ्या शेतकऱ्यांचे निम्म्याच्यावर क्षेत्र ऊस लागवडीत गुंतले तर उत्पन्नही भरमसाठ मिळू शकते. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना हा कारखाना वरदान ठरणार आहे तीच बाब डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी एकमुखी ठराव केलेला आहे.
---
सरासरी उतारा दहाच्या वर असणारी ऊसाची जात विकसित करणे आवश्यक
दरम्यान, यापूर्वी तीन-चार वर्षे सोडली तर या साखर कारखान्याचा ऊसातील साखरेचा सरासरी उतारा हा १० पेक्षा कमी आहे. म्हणून यापुढे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि कारखान्याचा साखर निर्माण करण्याचा सरासरी उताराही वाढेल अशी ऊसाची जात कारखाना परिसरात असलेल्या कारखान्याच्या शेतीत विकसित करण्याची गरज आहे.
----
चोपडा सहकारी साखर कारखान्यात जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांनी भाग भांडवल अडकविले आहे. भाग भांडवलदारांना सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या प्रकल्पातून मिळणारे लाभ दिले जाणेही आवश्यक आहे. यापूर्वी याच कारखान्याने भाग भांडवलदार सभासद शेतकऱ्यांना कमी दरात साखर उपलब्ध करून दिलेली आहे तर अनेक वेळा भेटवस्तूही दिल्या आहेत. म्हणून सहकारी तत्त्वावर चालवले जाणाऱ्या प्रकल्पांचे लाभ सभासदांना यापुढेही मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.