फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्वच आस्थापना बंद झाल्या. त्याचा परिणाम म्हणून अनेकांचा रोजगार बंद झाला. दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने शनिपेठ येथील तरुणांनी थेट दुचाकी चोरीचा मार्ग निवडला.
शनी पेठ परिसरातील बांडुक गँगचा प्रमुख शुभम ऊर्फ बांडुक शिवराम मिस्तरी (वय २०, रा. वाल्मीकनगर) व त्याचा साथीदार राहुल रवींद्र कोळी (१९, रा. मेस्कोमातानगर) या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या या गुन्हेगारी कार्यात आणखी एका अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बांडुक गँगचा प्रमुख शुभम मिस्तरी हा त्याच्या मित्रासोबत हा शनिपेठ परिसरातच दुचाकी चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी यांच्या पथकावर जबाबदारी सोपवली. या पथकाने असोदा रेल्वेगेटकडी हरिओम नगर, कलावसंत नगर भागात संशयितांचा शोध घेत असताना पथकाला विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून फिरताना शुभम मिस्तरी व राहुल कोळी हे मिळून आले. दोघांनी आणखी एका अल्पवयीन मुलाबरोबरच या तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या तीनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कापड दुकानावर कामाला
शुभम व राहुल हे दोघेही फुले मार्केटमध्ये बाहेर बसणारे कापड विक्री व्यावसायिकांकडे कामाला होते. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे फुले मार्केट बंद झाले. त्यामुळे या दोघांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. शुभम याने यापूर्वीही दुचाकी चोरी केली होती, त्यामुळे त्याला चोरीचे ज्ञान अवगत होते.
मित्राची दुचाकी सांगून घरातच लपविली
शुभम याने चोरलेल्या तीन दुचाकींपैकी एक दुचाकी स्वतःच्या घरात लपविली होती. आई-वडिलांनी दुचाकीबाबत विचारणा केली असता ही दुचाकी मित्राची आहे, तो बुलढाणा येथे मुळ गावाला गेला आहे म्हणून त्याने माझ्याकडे ठेवली असल्याचे सांगितले होते. दुसऱ्या दोन दुचाकी नंबरप्लेट काढून तिघेजण बाहेर वापरत होते. त्यामुळेच चोरीचा भांडाफोड झाला.