लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ रोजीच्या ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्ष स्वागताच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत जळगाव मनपा हद्दीत रात्री ८ ते सकाळी १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची मुभा जळगावकरांना देण्यात आली होती. दरवर्षी ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करीत उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्ष स्वागताच्या दिवशी नागरिकांना रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.