गोपाळ व्यासबोदवड : तालुक्यातील शेलवड गाव फाट्याजवळ सरकारी मालकीची गुरेचरणची जागा ग्रामपंचायतीने नमुना आठ लावून विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. जामनेर येथील व्यक्ती गुरेचरणच्या जागेवर बांधकाम करीत असल्याचे तलाठ्याला निदर्शनास आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.तालुक्यातील शेलवड गाव फाट्याजवळ सरकारी गायरान कुरणसाठी गट क्रमांक १६६ चे क्षेत्र राखीव आहे. या जागेवर २३ रोजी ४६ आर जमिनीवर खोदकाम सुरू असल्याचे तलाठी एम.व्ही. परिसे हे गावात जात असताना त्यांना दिसले. त्यांनी या जागेवर जावून पाहणी केली असता आठ-नऊ मजूर या जागेवर खोदकाम करून खड्डे करीत होते. तलाठ्याने त्यांना विचारले असता आम्ही मजूर आहोत. जामनेर येथील या जागेचे मालक श्यामराव भिकारी नरवाडे यांच्या सांगण्यावरून पोल्ट्री फार्मसाठी काम करून देत असल्याचे सांगितले. तलाठ्याने नरवाडे यांना संपर्क करत जागेसंबंधित विचारणा केली असता ही जागा शेलवड ग्रामपंचायतीने आपल्याला मालकी हक्काने दिली आहे. या जागेसंबंधित नमुना आठही आपल्याकडे असल्याचे सांगितले.ही जागा सरकारी असून, फक्त गायरान चराईसाठी राखीव आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीला ही जागा विकण्याचा अधिकार नाही. असे असताना हा प्रकार लक्षात आल्याने तलाठ्याने या जागेचा पंचनामा करीत दोन्हींकडील मंडळींचा जबाब नोंदवला तर जागा रिकामी करून घेण्यात आली.याच जागेवर सामाजिक वनीकरणच्या विभागांतर्गत ३३ कोटी वृक्ष लागवड करून लाखो रुपयांचा निधी रोजगार हमी योजनेतून काढला आहे. याबाबत या ठिकाणी एकही झाड जगलेले नाही, तर याबाबत तक्रारही गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.आजच्या घडीला पावसाळा संपत आला आहे. पन्नासवर ठिकाणी सामाजिक वनीकरणने कामे मंजूर केली आहे. याबाबत प्रभारी सामाजिक वनिकरण अधिकारी बेडकुळे यांची प्रतिक्रिया घेतली असता पंचनामा केला असल्याचे सांगितले.तलाठी एम.व्ही.परिसे यांनी या जागेवर पंचनामा करून तहसीलदारांकडे पाठविला असल्याचे सांगितले.याबाबत तहसीलदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ही जागा सरकारी आहे. ती विकण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार नसताना त्यांनी हा प्रकार केला कसा? याबाबत या ग्राम पंचायतीला नोटीस काढली आहे व त्यावर कारवाईही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारी गायरान जागेची चक्क विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 5:10 PM
शेलवड गाव फाट्याजवळ सरकारी मालकीची गुरेचरणची जागा ग्रामपंचायतीने नमुना आठ लावून विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्देतलाठ्याच्या सजगतेने उघडले गुपिततहसीलदारांनी ग्रामपंचायतीला काढली नोटीस