अशोक परदेशी
भडगाव : येथील नगरपरिषदेवर सध्या पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे प्रशासक आहेत. नगरपरिषदेच्या तिसऱ्या पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता. मात्र कोरोना परिस्थितीचा अडसर ठरल्याने निवडणूक लांबली होती. आता नागरिकांना नवीन प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम लागण्याची प्रतीक्षा आहे. एक सदस्यीय प्रभाग रचना व प्रभागातील जागांचे आरक्षण यापूर्वीच निवडणूक यंत्रणेने जाहीर केले आहे. भडगाव नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होतो याची नागरिकांना आतापासूनच प्रतीक्षा लागून आहे. आता २१ प्रभागात २१ सदस्य संख्या राहील. २१ पैकी ११ महिला सदस्या तर १० पुरुष सदस्य संख्या राहील. आतापासूनच इच्छुक उमेदवार प्रभागांमध्ये मतदारांच्या संपर्काला लागल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षही निवडून येणाऱ्या चांगल्या उमेदवारांच्या शोधात लागलेले आहेत. नगरपरिषदेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. भडगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत २००९ साली रुपांतर झाले. नगरपरिषदेची पहिली निवडणूक २०१० मध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली. २०१५ वर्षी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक झाली. नगरपरिषद सध्या शिवसेनेच्या ताब्यात होती. सध्या प्रशासक आहेत. सन २०२० ची पंचवार्षिक निवडणूक ही तिसरी आहे. ही निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. २१ प्रभागात निवडणूक तर सदस्य संख्याही २१ राहील. महिलांना शासनाने ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. २१ पैकी ११ सदस्या महिला तर १० सदस्य पुरुष राहणार आहेत. बहुतांश विद्यमान नगरसेवकांना या आरक्षण बदलाचा फटका बसणार आहे. पुरुष इच्छुक उमेदवारांना चांगलेच त्रासाचे ठरत आहे. इच्छुक सुरक्षित निवडुून येण्यासाठी प्रभागांचा शोध घेत फिरताना दिसत आहेत. या निवडणुकीत आपली सत्ता बसावी यासाठी शिवसेना, राष्टृवादी, भाजप यासह पक्षांमध्ये हालचाली होण्यास सुरुवात झालेली आहे. शेवटी राज्याप्रमाणे भडगावलाही महाआघाडी होते की काय? हे वेळेवरच समजणार आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्टृवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे अमोल शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, ाँग्रेसचे नेते प्रदीप पवार यासह पक्ष नेत्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.