अमळनेर : तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या आवारात वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना विविध कार्यालयात जाणे म्हणजे कसरतीचे काम झाले असून अनेकांना वाहने इतरत्र लावून कार्यालयात यावे लागते.
तहसील कार्यालयाच्या आवारात उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय, मुद्रांक अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, स्टॅम्प वेंडर कार्यालय , सेतू कार्यालय असल्याने दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते.
महसूल विभागातर्फे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ती वाहने तहसील आवारात तसेच तहसील आवाराबाहेर लावण्यात आली आहेत. तसेच खरेदी विक्री करणारे नागरिक, उत्पन्न, उतारे काढणारे, रेशन कार्ड, विविध लाभार्थी योजनांबाबत, पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग , शिक्षण विभाग , उपविभागीय कार्यालयात भूसंपादन विषयी, जातीचे दाखले याबाबत विद्यार्थी नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
तहसील कार्यालयातच आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी बेशिस्त पार्किंग आणि पार्किंगला जागा नसल्याने जेमतेम प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या वाहनांना जागा करून दिली जाते. त्यासाठी सुद्धा त्यांना प्रवेश करण्यास फक्त १० मीटर अंतर पार करण्यास १० ते १५ मिनिटे लागतात.
पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांच्या वाहनांना देखील जागा मिळत नाही. ते बाहेरच्या खाजगी जागेत तसेच रस्त्यावर पार्किंग करून वाहतुकीला अडथळे निर्माण करतात. शिस्त नसल्याने वाहने अस्ताव्यस्त लावली जातात त्यामुळे वृद्ध व महिलांना शासकीय कार्यालयात येण्यास कसरत करावी लागते. दिव्यांग नागरिकांना कार्यालयात येण्यासाठी दिव्यच करावे लागते. त्यामुळे सर्व कार्यालयाच्या प्रमुखांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवून पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.