मार्चपासून लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर, शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण केले. यात सुरुवातीपासूनच लसीकरणासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांना संधी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी मार्च ते एप्रिल दरम्यान लसीचा पहिला डोस घेतला. पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचे अंतर ठेवण्यात आल्याने मार्च-एप्रिलमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता दुसऱ्या डोससाठी आरोग्य मंत्रालयातर्फे मोबाइलवर लसीकरणाच्या तारखेचे संदेश पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावत आहेत.
तालुक्यातील पातोंडा आरोग्य केंद्रावर दररोज सकाळपासूनच नागरिक लसी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांची संख्या जास्त असून, सकाळपासून रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने, ऐन उतारवयात या नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळेना
लसीकरणासाठी सकाळपासून पातोंडा येथील आरोग्य केंद्रावर उभ्या असलेल्या नागरिकांना ऐनवेळी लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे नागरिकांना घराकडे परतावे लागत आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी लस उपलब्ध होईल, या आशेने हे नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे राहत आहेत. मात्र, लस नेमकी कधी येणार, किती लोकांना मिळणार? याबाबत नागरिकांना संबंधित आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य माहिती मिळत नसल्यामुळे या नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांच्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.