लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे जेथे वळण घेण्यास जागाच नाही. अशा ठिकाणी नागरिक बेफिकिरीने विरुद्ध दिशेने जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची शक्यता वाढली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएमआर आणि गुजराल पेट्रोलपंपजवळ अशा प्रकारे विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात असल्याचे दिसून येते.
गेल्या दीड वर्षापासून जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात सध्या गुजराल पेट्रोलपंपाजवळील चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे वळण घेण्यासाठी जागाच नाही. ज्यांना टिळक नगर, जुना निमखेडी रोड, हायवे दर्शन कॉलनी या भागात जाण्यासाठी थेट दादावाडी पर्यंत जावे लागते. त्यामुळे अनेक जण फिरून परत येण्याऐवजी विरुद्ध दिशेनेच प्रवास करतात
तसेच ज्यांना आयएमआर व गणेश कॉलनीच्या दिशेने जायचे आहे. त्यांना देखील तेथे वळण घेण्यासाठी जागा नाही. त्यांना विद्युत कॉलनी स्टॉपच्या समोरून वळणासाठी रस्ता देण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर अजून डांबरीकरण देखील झालेले नाही. त्यामुळे अनेकजण या ठिकाणी देखील विरुद्ध दिशेनेच येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आयएमआरकडून शिव कॉलनीकडे जाताना वळण घेण्यासाठी रस्ताच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महामार्ग धोकादायक बनत चालला आहे.
यु टर्नसाठी रस्ताच नाही.
महामार्गावर आयएमआरकडून शिवकॉलनीकडे जातांना वाहनचालकाला आधी शासकीय अभियांत्रिकीकडे उलट दिशेने यावे लागत आहे. मात्र तेथे काही अंतरावर काम सुरू असल्याने वाहनचालकांना वळण घेण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यासाठी थेट अग्रवाल चौकात यावे लागते. हा जवळपास अर्धा किमीचा फेरा टाळण्यासाठी बहुतेक वाहन चालक विरुद्ध दिशेनेच प्रवास करत आहेत.
कोट - सध्या बहुतेक वाहन चालक आयएमआरच्या ठिकाणी वळण न घेता विरुद्ध दिशेने ये-जा करत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात त्या ठिकाणी वळण घेण्यासाठी जागा केली जाणार आहे. - चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण