अमळनेर : शहरातील मिळचाळ- प्रभाग सहामध्ये शौचालयांची दुरवस्था झाली असून असुविधांमुळे रोगराईस सामोरे जावे लागत असल्याने परिसरातील महिलांनी थेट नगरपालिकेवर बुधवारी मोर्चा नेला. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी वैयक्तिक शौचालय योजनेतून नवीन बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा माघारी फिरला.गलवाडे रोड, शिवसमर्थ नगर, मिलचाळ, मुठे चाळ, धर्मशाळा परिसरात बऱ्याच दिवसांपासून साफसफाई केलेली नाही. शौचालयांच्या सेफ्टी टाक्यांची स्वच्छता नाही, भांडे तुटलेले आहेत, मैलाच्या टाक्या झाकलेल्या नाहीत, त्या परिसरात पथदिवे नसल्याने रात्री अंधार असतो. सेफ्टी टँकमध्ये पडण्याची भीती आहे, तसेच बºयाच वर्षांपासून असलेल्या नळांना तोट्या नसल्याने पाणी भरपूर प्रमाणात वाया जाते, त्यामुळे पाण्याचे डबके तयार होऊन डास व कीटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यास लागून गटारी तुडुंब भरल्याने लहान मुले व वृद्ध त्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्यांमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा नेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. काही वेळ महिलांनी पालिकेच्या पायºयांवर ठिय्या मांडला होता.मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी समस्येवर पर्याय म्हणून जुने शौचालय नादुरुस्त झाल्याने ते पाडून नागरिकांना वैयक्तिक शौचालय अनुदानातून ५ सीट शौचालय पालिकेच्या त्याच जागेवर बांधून देण्याचे सुचविले. त्याचा ताबा नागरिकांनाच देऊन त्याची देखभाल नागरिकांनीच करावी या उपायामुळे नागरिक समाधानी झाले. तसेच साफसफाईच्या व मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाºयांना दिल्या. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनीदेखील स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या. निवेदनावर मल्हारी आविले, हेमंत भोळे, दीपक जोशी, दिलीप नाईक, दत्ता नाईक, प्रशांत मालुसरे, राजू देशपांडे, सुरेश संनस, सचिन शिंदे, शेख मोहम्मद हुसेन, शेख मुस्तक अजीज, नंदकिशोर कापडणे, सुनील चव्हाण, महावीर मोरे, राजू ठाकूर, अजय गोरखे यांच्यासह ७० नागरिकांच्या सह्या आहेत.